Join us

गोळी झाडूनही त्या आमदाराला संरक्षण? भूमिका स्पष्ट करा, विरोधी पक्षनेत्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 9:27 AM

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुन्हा वरळीतील गोळीबाराचा मुद्दा उपस्थित केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुधवारी पुन्हा वरळीतील गोळीबाराचा मुद्दा उपस्थित केला. दादर पोलिस ठाण्याबाहेर जमावाच्या दिशेने केलेल्या गोळीबाराचा बॅलेस्टिक अहवाल आला आहे. या अहवालात ही गोळी त्या सत्ताधारी आमदाराच्या रिव्हॉल्व्हरमधून झाडल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र, असे असतानाही पोलिसांनी अजूनही त्या आमदारावर कोणतीही कारवाई केलेली नाही. कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने, ही गंभीर गोष्ट असून, सरकारने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.   

मुंबईत २०२२ साली गणेशोत्सवादरम्यान एका सत्ताधारी आमदाराने सार्वजनिक ठिकाणी रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडल्यामुळे निर्माण झालेल्या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर २८९ अन्वये दानवे यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. ते म्हणाले, दादरमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेत घटनास्थळावरून जप्त केलेले काडतूस हे सत्ताधारी आमदाराच्या जप्त केलेल्या रिव्हॉल्व्हरमधून  झाडल्याचे कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या बॅलेस्टिक अहवालातून सिद्ध झाले आहे. या प्रकरणी प्रथम गोळी झाडल्यावर काडतूस सापडले तरी त्याचा तपास आणि गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र, ११ जानेवारी २०२३ ला याच आमदाराच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली असल्याचा बॅलेस्टिक अहवाल समोर आला. मात्र, तरीही पोलिसांनी ही गोळी आमदारांनी झाडली नसल्याचे सांगून त्या आमदाराला क्लीन चिट दिली. एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीने जर गोळी झाडली असती तर आतापर्यंत त्याला पोलिसांनी अटक केली असती. ही बाब कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने चिंताजनक असल्याचे दानवे म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :अर्थसंकल्पीय अधिवेशनविधान परिषद