मुंबई : भ्रष्टाचारप्रकरणी आरोपी असलेल्या पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांना ५ ऑगस्टपर्यंत अटक करणार नाही, अशी माहिती मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली. पठाण यांच्यासह आयपीएस अधिकारी परमबीर सिंह व अन्य सहा जणांविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यात यावा आणि याचिका प्रलंबित असेपर्यंत अटकेपासून दिलासा मिळावा, यासाठी अकबर पठाण यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठापुढे होती.
मुख्य सरकारी वकील अरुणा पै-कामत यांनी याप्रकरणी उत्तर देण्यासाठी न्यायालयाकडून मुदत मागितली. त्यावर न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी ५ ऑगस्ट रोजी ठेवली. मात्र, तोपर्यंत पठाण यांना अटक करू नका, असे न्यायालयाने पोलिसांना बजावले.
मरिन ड्राईव्ह पोलीस स्टेशन पोलिसांनी बिल्डर श्यामसुंदर अगरवाल पठाण, परमबीर सिंह व अन्य सहा जणांवर भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा नोंदवला. तक्रारीनुसार, अगरवाल यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात येऊ नये यासाठी सिंह, पठाण व अन्य अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून ५० लाख रुपये व भाईंदर येथे टू बीएचके फ्लॅट मागितला.
पठाण यांनी हा गुन्हा कायद्याचे उल्लंघन करून दाखल करण्यात आल्याचे याचिकेत म्हटले आहे. अगरवाल याचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत आणि त्या तपासाला हानी पोहोचावी, यासाठी आपल्यावर गुन्हा नोंदवण्यात आल्याचे याचिकेत म्हटले आहे.
पठाण अजूनही पोलीस उपायुक्त आहेत. त्यामुळे त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही. ते सरकारी कर्मचारी असल्याने गुन्हा नोंदवण्यापूर्वी त्यांची प्राथमिक चौकशी करायला हवी, असा युक्तिवाद पठाण यांच्या वतीने ॲड. नितीन प्रधान यांनी न्यायालयात केला.
लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत आधी प्राथमिक चौकशी व नंतर खुली चौकशी करणे बंधनकारक आहे. त्यानंतर गुन्हा घडल्याचे वाटले तर संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना सरकारकडून मंजुरी घेणे आवश्यक आहे, असे प्रधान यांनी म्हटले.
अगरवाल यांच्यावर १९ फौजदारी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत, असे पठाण यांनी याचिकेत म्हटले आहे.