नरेंद्र मेहतांना ३० मेपर्यंत अटकेपासून संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 11:37 AM2022-05-27T11:37:07+5:302022-05-27T11:37:43+5:30

बेहिशेबी मालमत्ता जमविल्याचा आरोप

Protection of Mehta from arrest till May 30 by court | नरेंद्र मेहतांना ३० मेपर्यंत अटकेपासून संरक्षण

नरेंद्र मेहतांना ३० मेपर्यंत अटकेपासून संरक्षण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
मीरा रोड :  भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यातील आरोपी भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता व त्यांची पत्नी सुमन यांना ३० मेपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी दिले. त्यामुळे मेहता दाम्पत्यास तूर्तास दिलासा मिळाला आहे. 

नगरसेवक, आमदारपदाचा गैरवापर करून सव्वाआठ कोटी रुपयांची अपसंपदा गोळा केल्याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात नरेंद्र मेहता व त्यांची पत्नी सुमन यांच्याविरुद्ध १९ मे २०२२ रोजी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर मेहता दाम्पत्याने अटकपूर्व जामिनासाठी ठाणे न्यायालयात याचिका दाखल केली होती. ठाणे न्यायालयात न्यायाधीश आर.आर. काकाणी यांनी अटकपूर्व जामीन अर्जावर मेहता दाम्पत्यास तत्काळ कोणता दिलासा न देता ३० मे ही तारीख सुनावणीसाठी दिली. त्यामुळे मेहता दाम्पत्याने अटकेपासून संरक्षण मिळावे 
म्हणून मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या संकेतस्थळावर आधी १ जून ही पुढील सुनावणीची तारीख होती. पण, नंतर २६ मे रोजी सुनावणी ठेवण्यात आली. 

पुढील सुनावणीकडे लागले सर्वांचे लक्ष
    उच्च न्यायालयात मेहता यांचे वकील आबाद पोंडा यांनी ठाणे न्यायालयाने अटकपूर्व जामीनअर्जावर कोणताच निर्णय दिला नसल्याचा मुद्दा उपस्थित करत दिलासा देण्याची मागणी केली. सरकारी वकील अरुण पै यांनी मेहतांवर दाखल अनेक गुन्हे तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मेहतांना अनेकवेळा नोटीस बजावूनदेखील त्यांनी सहकार्य केले नसल्याचे सांगत मेहतांच्या वकिलांचा युक्तिवाद खोडून काढला. 
    न्यायाधीश भारती डांगरे यांनी सरकारी वकिलांना विचारणा केल्यावर ३० मेपर्यंत आरोपींना अटक करणार नाही, असे सांगण्यात आल्याने मेहता दाम्पत्यास तूर्तास अटकेपासून संरक्षण मिळाल्याचे उपस्थित वकिलांकडून सांगण्यात आले. आता मेहता दाम्पत्याच्या अटकपूर्व जामीनअर्जावर ३० मे रोजी ठाणे न्यायालय काय निर्णय देणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Protection of Mehta from arrest till May 30 by court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.