परांजपे बंधूंना मंगळवारपर्यंत अटकेपासून संरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:05 AM2021-07-03T04:05:57+5:302021-07-03T04:05:57+5:30
अटकपूर्व जामीन अर्जावर ६ जुलैला सुनावणी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पुण्यातील नामांकित विकासक परांजपे बंधू यांनी अटकपूर्व जामिनासाठी ...
अटकपूर्व जामीन अर्जावर ६ जुलैला सुनावणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पुण्यातील नामांकित विकासक परांजपे बंधू यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली आहे. शुक्रवारी दिंडोशी कोर्टात त्यांच्या वकिलांनी याबाबत अर्ज दाखल केला असून त्यावरील सुनावणी येत्या मंगळवारी होणार असल्याने तोपर्यंत पोलिसांना त्यांच्यावर अटकेची कारवाई करता येणार नाही.
ॲड. सुबोध देसाई हे श्रीकांत परांजपे तर ॲड. निरंजन मुंदरगी हे शशांक परांजपे यांच्या वतीने कोर्टात बाजू मांडत आहेत. पुण्यातील राहत्या घरातून श्रीकांत आणि शशांक पुरुषोत्तम परांजपे या दोघांना विलेपार्ले पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर पोलीस त्यांची सतत चौकशी करत आहेत. २ जुलै, २०२१ रोजी ॲड. देसाई व ॲड. मुंदरगी यांनी कोर्टात जामीन अर्ज दाखल केला असून याप्रकरणी येत्या ६ जुलै, २०२१ पर्यंत त्यांना आंतरिम दिलासा मिळाला आहे.
खोटे कागदपत्र बनवून फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर वसुंधरा डोंगरे यांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार विलेपार्ले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘माझ्या अशिलांवर लावण्यात आलेले आरोप तथ्यहीन आहेत, हे सर्व आरोप सिव्हिल नेचरचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे, त्यामुळे तक्रारदाराने आता ३० ते ४० वर्षांपूर्वीचे प्रकरण काढत आमच्यावर दखलपात्र गुन्हा नोंदविला, ज्यात आम्हाला अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यामुळे पुन्हा अशाप्रकारे खोट्या आरोपात माझ्या अशिलांना गुंतविण्याचा प्रयत्न होतोय.
(ॲड. निरंजन मुंदरगी - शशांक परांजपे यांचे वकील)