मुंबई : मंत्रालयात वारंवार होणा-या आत्महत्या आणि आत्महत्यांचे प्रयत्न रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मंत्रालयात नायलॉनच्या संरक्षक जाळ्या बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दुस-या मजल्याला समांतर संरक्षक जाळी बसविण्यात आली असून उर्वरित सर्व मजल्यांच्या लॉबीसुद्धा जाळीने झाकल्या जाणार आहेत.गेल्या आठवड्यात मंत्रालयाच्या ५व्या मजल्यावरून त्रिमुर्ती प्रांगणात उडी मारत हर्षल रावते या ४३ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली होती. स्वत:च्या महुणीच्या खुनाच्या आरोपाखाली जन्पठेपेत असणाºया हर्षलला शिक्षेत सुट हवी होती. याच मागणीसाठी तो मंत्रालयात आला होता. त्यापूर्वी २२ जानेवारीला धर्मा पाटील या वयोवृद्ध शेतकºयाने मंत्रालयातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांचा पुढे उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच, अहमदनगरचा रहिवासी अविनाश शेटे (२५) यांनेही मंत्रालयात स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. अविनाशने कृषी अधिकारीपदासाठी परीक्षा दिली होती. यात अपयशी ठरलेल्या अविनाशने फेरतपासणीची मागणी केली होती. त्यासाठी तो वारंवार मंत्रालयात खेटे घालत होता.दरम्यान, विरोधकांनी मात्र मंत्रालयात जाळी बसविण्याच्या कामावर सडकून टीका केली आहे. ‘लोकांनी उड्या घेऊ नये म्हणून मंत्रालयात संरक्षक जाळी लावण्यात आली. पण फक्त जाळी लावून उपयोग नाही. जनतेला न्याय द्यायचा असेल तर सरकारने आधी आपल्या कारभारावर लागलेली जाळी-जळमटी काढली पाहिजेत. ती जाळी काढणार नसाल तर या जाळीचा काडीचाही उपयोग नाही,’ असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी हाणला आहे.आत्महत्या का होतात, ते शोधा!हे मंत्रालय आहे की सर्कशीचा तंबू, असा सवाल करत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आत्महत्या का होत आहेत, यामागील मूळ शोधा, असा सल्ला सरकारला दिला आहे.
आत्महत्या रोखण्यासाठी मंत्रालयात संरक्षक जाळ्या; विरोधकांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 1:13 AM