Join us

पावसाळ्याआधी मॅनहोल्सवर संरक्षक जाळ्या; मुंबई महापालिकेकडून उपाययोजना 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 9:48 AM

मुंबईतील मॅनहोल सुरक्षित करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून विविध पर्याय निवडले जात आहेत.

मुंबई :  मुंबईतील मॅनहोल सुरक्षित करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून विविध पर्याय निवडले जात आहेत. पालिकेच्या मलनि:सारण विभागाकडून तीन वॉर्डांतील मॅनहोल्सवर संरक्षक जाळ्या बसविण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आर दक्षिण, सी आणि डी  येथे प्रयोग केला जाणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली की, लगेचच पावसाळ्याआधी या जाळ्या बसविण्यास सुरूवात केली जाणार असल्याची माहिती मलनि:सारण विभागातील सूत्रांनी दिली.

मलनि:सारण विभागाचे मुंबईत ७४ हजार, पर्जन्यजलवाहिन्या विभागाचे २५ हजारांहून अधिक मॅनहोल्स आहेत. हे मॅनहोल्स संरक्षित करण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. दीड वर्षात मॅनहोल्सची झाकणे चोरीला जाणे किंवा ती नसणे, झाकण खराब होणे किंवा तुटणे इत्यादी दुरवस्था होत आहे. मॅनहोलचे झाकण चोरीला गेल्यावर थेट गुन्हा दाखल करण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. तसेच नुकत्याच झालेल्या सुनावणीत उघड्या मॅनहोलसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला खडे बोल सुनावले.  संरक्षक जाळ्या बसवण्यास उच्च न्यायालयानेही पालिकेला सूचना केली आहे. 

त्यानुसार महापालिकेच्या मलनि:सारण विभागाने स्टेनलेस स्टील, फायबर, डक्टाइल जाळ्या बसवण्याचे नियोजन केले आहे. तिन्ही प्रकारांतील जाळ्या पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर आणि शहर भागातील मलनि:सारणच्या अखत्यारीतील मॅनहोलवर बसविण्यात येणार आहेत. मॅनहोल्सपैकी साधारण साडेसहा हजार मॅनहोल्सवर साध्या प्रकारातील धातूच्या जाळ्या बसविण्यात आल्या आहेत.

मॅनहोलमध्ये पडण्याची भीती राहणार नाही :

पावसाळ्यात पाणी तुंबल्यामुळे पर्जन्य जलवाहिन्या व मलनिःसारण वाहिन्यांवरील मॅनहोल्सची झाकणे उघडण्यात येतात. तुंबलेल्या पाण्यात झाकण उघडे असल्याचे नागरिकांना लक्षात येत नाही. त्यामुळे मॅनहोलमध्ये पडून दुर्घटना होण्याची दाट शक्यता असते. यासाठी मॅनहोल झाकणाच्या खाली लोखंडी जाळी बसविण्यात येत आहे. या जाळीमुळे पाणी तुंबल्यानंतर झाकण उघडले तरी मॅनहोलमध्ये पडण्याची भीती राहणार नाही.

एकूण मॅनहोल्स - १,००,२८६

मलनिःसारण विभाग - ७४,६९३

पर्जन्य जलवाहिन्या विभाग - २५,५९३

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामोसमी पाऊस