लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मन प्रसन्न करणारी विविधरंगी फुलझाडे, उत्कट भावनांचे प्रतीक असलेली तलावाकाठची हिरवळ, सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य डोळे भरून पाहण्याची सोय, सेल्फी पॉइंट आणि जोडीला विद्युत रोषणाईचा साज यामुळे गेल्या काही वर्षांत पवई हे उपनगरातील हक्काचे पर्यटनस्थळ म्हणून पुढे आले आहे. आता येथील रस्त्यांवरच्या संरक्षक भिंती इतिहासाच्या रंगांनी उजळल्यामुळे पवईच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.
जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील (आयआयटी मुंबईलगत) संरक्षक भिंतींवर शिवकालीन किल्ले, जलदुर्ग, ब्रिटिशकालीन वास्तू, शिल्पकला, एलिफंटा-घारापुरी लेण्या, गेट वे ऑफ इंडिया अशा वारसा स्थळांची चित्रे रेखाटण्यात आली आहेत. स्वच्छता सर्वेक्षण २०२१ अंतर्गत मुंबई पालिकेने या भिंतींना इतिहासाच्या रंगांचा साज दिला आहे. राजकीय पक्ष, नेतेमंडळी आणि कंपन्यांच्या नोकरीसंदर्भातील जाहिराती चिकटविल्याने विद्रूप झालेल्या या भिंतींना यानिमित्ताने झळाळी प्राप्त झाली आहे.
त्याशिवाय राणीची बाग, म्हातारीचा बूट, हॅंगिंग गार्डन, नेहरू विज्ञान केंद्र, पालिका मुख्यालय, तारापूर मत्स्यालय, आयआयटीची इमारत आणि चौपाट्यांची चित्रेही रेखाटण्यात आल्याने संपूर्ण मुंबई डोळ्यांत साठविण्याची नामी संधी यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे. जवळपास ५०० मीटरवर अत्यंत हुबेहूब पद्धतीने काढलेली ही चित्रे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. त्यामुळे पवई तलाव, हिरानंदानी परिसर, आयआयटी संकुल आणि आता या चित्रांमुळे पवईत चौथे पर्यटन स्थळ तयार झाल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली.
मात्र, शेजारी सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे या भिंतीवर धूळ साचत असल्याने चित्रांवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे दिवसातून एकदा ही धूळ साफ करण्यात यावी, अशी मागणी येथे सेल्फी काढण्यासाठी आलेल्या एका तरुणाने व्यक्त केली.
.............
सेल्फीसाठी गर्दी
येता-जाता डोळे दिपविणारी ही चित्रे पाहिल्यानंतर कोणालाही त्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरत नाही. अनेक कारचालक, दुचाकीस्वार मुद्दाम थांबून फोटो काढतात आणि या चित्रांचा संग्रह आपल्या मोबाइलमध्ये करून ठेवतात. सुटीच्या दिवशी तर खास सेल्फी काढण्यासाठी अनेक जण गर्दी करीत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.