Join us

विचित्र अपघातात सुरक्षारक्षकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 2:02 AM

एका विचित्र अपघातात सुरक्षारक्षकाचा कंटेनरखाली येऊन मृत्यू झाला.

मुंबई : एका विचित्र अपघातात सुरक्षारक्षकाचा कंटेनरखाली येऊन मृत्यू झाला. कांदिवली परिसरात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या ठिकाणी शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालकाला अटक केली आहे.अथर्व महाविद्यालयाजवळ लिंक रोड परिसरात मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यानुसार शुक्रवारी या कामासाठी लागणारे साहित्य घेऊन एक कंटेनर भरधाव वेगाने गेटच्या आत येत होता. दरम्यान, त्यातील काही साहित्य हे प्रकल्प सुरू असलेल्या गेटवरील दोरीला अडकले. त्यामुळे कंटेनरच्या वेगाने दोरी खेचली गेली आणि त्याचा धक्का बॅरिकेट्सला लागला. त्यामुळे ते उखडून त्यात तेथे कर्तव्यावर असलेले सुरक्षारक्षक गड्डामेडी कुमरय्या (४६) अडकले. बेसावध असल्याने अडखळून ते रस्त्यावर कोसळले आणि कंटेनरच्या मागच्या चाकाखाली येऊन गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने शताब्दी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. त्यांचे सहकारी जंकेश यादव (२७) यांनी हा सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. त्यांच्या तक्रारीनुसार कांदिवली पोलीस ठाण्यात कंटेनर चालक जर्मनजीत सिंग रंधवा (४६) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकल्प मेट्रोचा असला तरी तेथे खासगी कंत्राटदार काम करीत आहेत. त्यांच्यावर सुरक्षेची जबाबदारी होती. दरम्यान, कंटेनर चालक रंधवा याला आम्ही अटक केली आहे, अशी माहिती कांदिवली पोलिसांनी दिली.