Join us

निवृत्त नौदल अधिका-याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 6:13 PM

मारहाण केल्याप्रकरणी कलम ४५२ हे अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन

मुुंबई : निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण करणाऱ्या शिवसेनेच्या शाखाप्रमुखाविरोधात कारवाई करण्याचे नाटक ठाकरे सरकार कडून करण्यात आले होते. या विरोधात कांदिवली (पूर्व) विधानसभा मतदार संघाचे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली व विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत आज दुपारी अप्पर पोलीस आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन मारहाण प्रकरणातील सर्व आरोपींच्या विरोधात घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी कलम ४५२ हे अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन अप्पर पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिले अशी माहिती आमदार अतुल भातखळकर यांनी दिली.

काल दुपारी कांदिवली येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथे राहणारे निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्टून फॉरवर्ड केल्यामुळे त्यांच्या घरात घुसून शिवसेनेचा शाखाध्यक्ष कमलेश कदम व त्याच्या ८-१० साथीदारांनी जबर मारहाण केली. मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे सोडून पोलिस मदन शर्मा यांनाच अटक करण्यास गेली होती. या विरोधात आमदार भातखळकर यांनी मारहाण केलेल्या आरोपींना अटक करण्याची मागणी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. परतू राज्याला गुंडागर्दीचे राज्य बनवू पाहणाऱ्या ठाकरे सरकारच्या दबावाखाली येऊन पोलिसांनी जामीनपात्र कलम लावून केवळ कारवाई करीत असल्याचे नाटक केले. काल रात्रीच सर्व आरोपींना पोलीस स्थानकातूनच जामीन मंजूर करून सोडून देण्यात आले.मात्र मारहाण झालेले मदन शर्मा हे मालाड (पूर्व) येथील संजीवनी इस्पितळात आहेत व आरोपी मोकाट सुटले आहे. स्वतःच्या जीवाची काळजी न करता देशसेवा करणाऱ्या निवृत्त सैनिकाला शिवसेनेच्या गुंडाकडून ज्या प्रकारे मारहाण करण्यात आली आहे ही बाब मान खाली घालणारी आहे, असे आमदार भातखळकर यांचे म्हणणे आहे.   एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याला घरात घूसून शिवसैनिकांकडून मारहाण केली जात असताना सुद्धा सरकार झोपेचे सोंग घेत असून, सरकारच्या विरोधात जे बोलतील त्यांना मारहाण केली जात आहे, त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले जात आहेत, त्यांच्या विरोधात सूडाचे राजकारण करण्याचे काम सरकारकडून केले जात आहे, असे भातखळकर यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :राज्य सरकारगुन्हेगारीमुंबई