मेट्रो कारशेडसाठी वृक्षतोड करण्यास विरोध;आरेमध्ये भरपावसात लोकांनी केली मानवी साखळी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2019 01:23 PM2019-09-01T13:23:02+5:302019-09-01T13:25:09+5:30
आरेतील वृक्षतोडीच्या विरोधात सुमारे 82000 हरकती आल्या.मात्र याकडे दुर्लक्ष करत येथील वृक्षतोडीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
मनोहर कुंभेजकर
मुंबई - मेट्रो कारशेडच्या उभारणीसाठी वृक्ष प्राधिकरण समितीने आरेतील 2328 झाडे तोडण्यास परवानगी दिली आहे.याविरोधात तरुणाईसह अनेक पर्यावरणवादी संस्था संस्था एकवटल्या आहेत. रविवारी सकाळी 11 वाजता विविध पर्यावरण संस्थांचे कार्यकर्ते, महाविद्यालयाचे पदाधिकारी व नागरिक यांनी भर पावसात आरे पिकनिक स्पॉटजवळ सकाळी 11 वाजता एकत्र जमले होते. त्यांनी मोठी मानवी साखळी करून येथील 2328 वृक्ष तोडीचा निषेध नोंदविला. सुमारे 1000 नागरिकांनी येथील आदिवासी बांधवांसह तरुणाईने मोठा सहभाग नोंदविला असल्याची माहिती आरे कॅनझर्व्हेशन ग्रुपचे यश मारवा यांनी लोकमतशी बोलतांना दिली. यावेळी सेलिब्रिटी श्रद्धा कपूर देखील या मानवी साखळीत सहभागी झाल्या आणि त्यांनी देखील येथील वृक्षतोडीला विरोध केला अशी माहिती मारवा यांनी दिली.
आरेतील वृक्ष तोडीला शिवसेना, मनसे व काँग्रेसने देखील विरोध केला आहे. वृक्ष वाचवण्यासाठी वेळ पडल्यास या राजकीय पक्षांना सोबत घेऊन मोठे "चिपको आंदोलन" छेडण्याची तयारी आम्ही करत असल्याची माहिती त्यांनी दिली. या मानवी साखळी आंदोलनात राधिका झवेरी, सुशांत बाली, निशांत बंगेरा यांच्यासह आरे कॅनझर्व्हेशन ग्रुप,म्यूज आणि अनेक संस्था सहभागी झाल्या होत्या. सकाळी 11 वाजता सुरू झालेले मानवी साखळी आंदोलन दुपारी 2 वाजेपर्यंत सुरूच राहणार असून या आंदोलनाला उस्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती मारवा यांनी दिली.
आरेतील वृक्षतोडीच्या विरोधात सुमारे 82000 हरकती आल्या.मात्र याकडे दुर्लक्ष करत येथील वृक्षतोडीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आरे हा मुंबईचा मोठा हरित पट्टा असून आरे वाचवण्यासाठी मोठया संख्येने मुंबईकरांनी रस्त्यावर उतरून याला कडाडून विरोध करावा असे आवाहन यश मारवा यांनी केले. आरे मधील झाडे तोडण्यास तरुणाई व महाविद्यालयाचे विद्यार्थी देखील सरसावले असून येथील वृक्षतोडीच्या विरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून ते जनजागृती करत आहे.फ्रायडे फॉर फ्युचर आणि इतर पर्यावरणवाद्यांनी आणि संस्थांनी देखील आरेच्या वृक्षतोडीला तीव्र विरोध दर्शविला आहे.
आरेच्या वृक्ष तोडीला विरोध म्हणून चर्चगेट,शिवाजी पार्क,वांद्रे,अंधेरी,बोरिवली,ठाणे, वाशी या सात विविध ठिकाणी सेव्ह आरे आणि इतर पर्यावरणवादी शुक्रवारी सायंकाळी 5.30 ते 7.30 या वेळेत आंदोलन करून आपला तीव्र निषेध व्यक्त केला.आरे वाचवा,झाडे वाचवा या मागणीसाठी तरुणाईने काल पालिका मुख्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली होती. फ्रायडे फॉर फ्युचर या संस्थेच्या पूजा डोमडीया यांनी लोकमतशी बोलतांना ही माहिती दिली. मोठ्या प्रमाणत आरेत होणाऱ्या वृक्षतोडीमुळे भविष्यात येथील पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार असल्याचे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
आरेच्या 2328 वृक्षतोडीमुळे 27 आदिवासी पाड्यांचे नुकसान होणार आहे. पर्यावरण नष्ट करण्यासाठी सुरू असलेला हा प्रयत्न रस्त्यावर उतरून हाणून पाडू. त्यासाठी न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या कॅसँड्रा नासरेथ यांनी दिली. आरे बचाव चा लढा हा पूर्ण आरे जंगल संरक्षित करण्याचा आहे.मेट्रो कारशेड, मेट्रो भवन, प्राणी संग्रहालय ,आर टी ओ कार्यालय, एसआरए योजना राबविणे या सगळ्याला मुंबईकरांचा कडाडून विरोध आहे. आमची मुख्य मागणी आरे पुन्हा ना विकास क्षेत्र "करण्याची आहे. मेट्रो शेड तर थांबवूच पण इतर कुठल्याही प्रोजेक्टला आरेच्या आत घुसू देणार नाही असा ठाम निर्धार सेव्ह आरे,आरे कॅनझर्व्हेशन ग्रुप,फ्रायडे फॉर फ्युचर आणि इतर पर्यावरणवादी संस्थांनी केला आहे.