Join us

ट्रिपल तलाक विधेयकाविरोधात उद्या निदर्शने; रजा अकादमीचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2019 9:12 PM

भायखळ्यातील मदनपुरा येथील बडी मशीदीच्या बाहेरुन आंदोलनाला सुरवात करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजुम्माच्या नमाज पठणानंतर या निर्णयाविरुद्ध धरणे आंदोलन करण्याचा निर्णय रजा अकादमीच्या कार्यालयात घेण्यात आला आहे. ट्रिपल तलाक विधेयकाच्या विरोधात देशभरात आंदोलन करुन नागरिकांसमोर सत्य बाजू मांडली जाईल, असे रजा अकादमीचे महासचिव सईद नुरी यांनी सांगितले.

मुंबई : केंद्र सरकारने ट्रिपल तलाक विरोधात मंजूर केलेल्या विधेयकाला विरोध करण्यासाठी मुस्लिम धार्मिक विचारवंत व संघटनाकडून शुक्रवारी आंदोलन करण्यात येणार आहे. जुम्माच्या नमाज पठणानंतर या निर्णयाविरुद्ध धरणे आंदोलन करण्याचा निर्णय रजा अकादमीच्या कार्यालयात घेण्यात आला आहे. भायखळ्यातील मदनपुरा येथील बडी मशीदीच्या बाहेरुन आंदोलनाला सुरवात करण्यात येणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने तोंडी तलाक अवैध ठरविला आहे, त्यामुळे त्या पद्धतीने एखाद्या मुस्लिम पुरुषाने आपल्या पत्नीला सोडचिठ्ठी देण्याचा प्रयत्न केल्यास तो अनाधिकृत ठरतो, त्यामुळे त्याचा विवाह मोडत नाही. असे असताना त्याबाबत पुरुषांना तीन वर्षाची शिक्षा देण्याची तरतूद केंद्र सरकारने नव्या विधेयकात केलेली आहे, ती पुर्णपणे अन्यायी व चुकीची आहे, त्यामुळे त्याविरोधात देशभरातील मुस्लिम समाजाकडून कडाडून विरोध केला जाईल, त्यासाठी प्रसंगी न्यायालयात दाद मागितली जाईल, असा इशारा गुरुवारी मस्जिद बंदर परिसरातील रजा अकादमीच्या बैठकीत धर्मगुरुकडून देण्यात आला. यावेळी संस्थापक महासचिव सईद नुरी, मौलाना मकसूद आली, मौलाना एजाज कश्मीरी, मौलाना खलीललुर्रमान, मौलाना अमानुल्लाह, कारी सरफुरुद्दीन यांनी केंद्र सरकार तीन तलाकच्या निमित्याने जाणीवपूर्वक मुस्लिम धर्माला बदनाम करीत आहे, त्यामागे समाजात दुही माजविणे आणि मुस्लिम पुरुषांना त्रास देणे हा हेतू असल्याचे स्पष्ट आहे. त्यांना जर खरोखरच मुस्लिम महिलांच्या हिताचा विचार करावयाचा असल्यास त्यांनी मुस्लिम आरक्षण आणि निराधार मुस्लिम महिलांना अनुदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले. ट्रिपल तलाक विधेयकाच्या विरोधात देशभरात आंदोलन करुन नागरिकांसमोर सत्य बाजू मांडली जाईल, असे रजा अकादमीचे महासचिव सईद नुरी यांनी सांगितले.

टॅग्स :तिहेरी तलाकमुंबईमुस्लीम