Mumbai Metro : मेट्रो ट्रायल रनच्या कार्यक्रमादरम्यान भाजपचं काळे झेंडे दाखवून निषेध आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 04:44 PM2021-05-31T16:44:59+5:302021-05-31T16:45:47+5:30
आमदार अतुल भातखळकर यांना अटक. ठाकरे सरकारच्या हेकेखोरपणामुळेच अजून केवळ चाचण्या घेण्याची वेळ आली, भातखळकर यांची टीका
मुंबई :मुंबईमेट्रोच्या ट्रायल रन कार्यक्रमाच्या उद्घाटनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निषेधार्थ मुंबई भाजप प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्त्वाखाली सोमवारी भाजपच्यावतीने काळे झेंडे दाखवून निषेध आंदोलन करण्यात आले. भाजप सरकारच्या काळात प्रगतीपथावर असलेल्या मेट्रोचे काम आधी हट्टापायी रखडवून, नंतर प्रकल्प किंमत वाढवून आता श्रेयासाठी लाखो रुपयांची जाहिरातबाजी केल्याचं म्हणत महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी आकुर्ली मेट्रो स्टेशनबाहेर फलक दाखवून जोरदार घोषणाबाजीही केली. पोलिसांनी आमदार भातखळकर यांच्यासह भाजपाच्या कार्यकर्त्यांना अटक केली.
"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आरेच्या मेट्रो कारशेडला स्थगिती देत कांजूरमार्गला स्थलांतरित करण्याच्या निर्णयामुळे तसेच आडमुठ्या धोरणांमुळे प्रकल्पाची किंमत तब्बल ८ हजार कोटींनी वाढली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात केंद्र सरकारच्या मदतीने वेगाने पूर्ण होत आलेल्या मेट्रो प्रकल्पाला ब्रेक लावण्याचे काम ठाकरे सरकारने केले. आता फडणवीसांच्याच प्रकल्पाचे श्रेय लाटण्यासाठी लाखो रुपयांची जाहिरातबाजी करून चाचणी मार्गिकांचे उद्घाटन करण्याचा घाट ठाकरे सरकार घालतंय," असं म्हणत भातखळकरांनी याचा निषेध केला.
मेट्रोचा खेळखंडोबा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांविरोधात ट्रायल रनच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी आमदार अतुल भातखळकरांच्या नेतृत्त्वाखाली काळे झेंडे दाखवून भाजपाचे निषेध आंदोलन; आमदार अतुल भातखळकर यांना अटक pic.twitter.com/Nof60M3Ybz
— Lokmat (@MiLOKMAT) May 31, 2021
"ठाकरे सरकारने आरे येथील मेट्रो कारडेपो इतरत्र हलवण्याचा निर्णय घेतला खरा पण नवीन मेट्रो कारशेड कुठे करायचा हे अद्याप ते ठरवू शकले नाही. आरेमध्ये डेपो झाला असता तर आज कुलाबा-सिप्झ मेट्रो धावताना दिसली असती. परंतु ठाकरे सरकारच्या हेकेखोरपणामुळेच अजून केवळ चाचण्या घेण्याची वेळ आली आहे, असं ते म्हणाले. "कोरोना संकटाच्या काळात मेट्रो उद्घाटनाच्या ठिकाणी लेझर शो करणे, आकुर्ली मेट्रो स्टेशन फुलांच्या माळांनी सजविणे आणि प्रसारमाध्यमांमध्ये कार्यक्रमाच्या जाहिराती देत करोडो रुपयांचा चुराडा करण्यापेक्षा तो पैसा कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या जनतेसाठी वापरता आला नसता का?," असा सवालही त्यांनी यावेळी केला.