आपले सरकार महाऑनलाईन' संकेतस्थळ तातडीने पूर्ववत न केल्यास आंदोलन, महाविद्यालयीन विध्यार्थ्यांसाठी राष्ट्रवादी मैदानात
By मनोहर कुंभेजकर | Published: June 24, 2023 07:12 PM2023-06-24T19:12:36+5:302023-06-24T19:13:09+5:30
आपले सरकार महाऑनलाईन संकेतस्थळ तातडीने कार्यान्वित न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते ॲड.अमोल मातेले यांनी दिला आहे.
मुंबई - आपले सरकार महाऑनलाईन सेवेच्या संकेतस्थळाचा वेग मंदावल्याने आरक्षित कोट्यांतून महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे आपले सरकार महाऑनलाईन संकेतस्थळ तातडीने कार्यान्वित न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते ॲड.अमोल मातेले यांनी दिला आहे.
मुंबई सह राज्यभरात आपले सरकार महाऑनलाईन सेवेचा विध्यार्थ्यांना नाहक त्रास होत आहे. सध्या दहावी आणि बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी लगबग सुरु आहे.परंतु एकीकडे आपले सरकार गतिमान सरकार म्हणून राज्य सरकार मोठं प्रमाणात जाहिरातबाजी करत आहे तर दुसरीकडे याच गतिमान सरकारच्या 'आपले सरकार महाऑनलाईन सेवेच्या संकेतस्थळाचा वेग मंदावल्याने आरक्षित कोट्यांतून महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विध्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
गेल्या आठवड्यापासून संकेतस्थळ मंदावले आहे. तांत्रिक बिघाडाचे कारण सांगितले जात असले, तरी विभागाकडून झालेला गलथानपणाच यास कारणीभूत असल्याचा आरोप ॲड.अमोल मातेले यांनी केला आहे. या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्यच धोक्यात आले आहे. संकेतस्थळ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे तसेच नोंदणीची मुदत वाढवावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा त्यांनी दिला आहे.