पालघरात आंदोलकांना अटक
By admin | Published: April 10, 2015 12:14 AM2015-04-10T00:14:14+5:302015-04-10T00:14:14+5:30
बिल्डरधार्जिण्या आणि शेतकऱ्यांसह स्थानिकांना उद्ध्वस्त करणाऱ्या पालघरच्या प्रारुप विकास आराखड्याविरोधात १८
पालघर : बिल्डरधार्जिण्या आणि शेतकऱ्यांसह स्थानिकांना उद्ध्वस्त करणाऱ्या पालघरच्या प्रारुप विकास आराखड्याविरोधात १८ दिवसांपासून उपोषणासह आंदोलन करूनही शासनसह पालकमंत्र्यांकडून त्याची दखल घेण्यात आली नाही. याच्या निषेधार्थ गुरुवारी पुन्हा प्रारुप विकास आराखडा संघर्ष समितीच्या वतीने नगररचना विभागासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली.
पालकमंत्र्यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन संघर्ष समितीने या प्रश्नाचे गांभीर्य समजावून सांगूनही त्यांच्याकडून व शासनाकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने गुरुवारी सकाळी प्रारुप विकास आराखडा संघर्ष समितीच्या वतीने पालघरच्या नगररचना कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करीत कार्यालयाचा मार्ग रोखून धरला. यावेळी नगररचना विभागाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्यानंतर पालघर पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांनी अटक केली. त्यांच्या विरोधात मुंबई पोलीस अधिनियम कलम ६८ अन्वये कारवाई करीत १५ महिलांसह एकूण ५३ लोकांना अटक करून नंतर सोडून देण्यात आले.
पालघर नगरपरिषदेचा प्रारुप विकास आराखडा रद्द करावा या मागणीसाठी टेंभाडे, अल्याळी, नवळी, वेवूर, गोठणपूर या गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी २३ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. या उपोषणकर्त्यांची भेट घेण्याचे साधे सौजन्यही पालकमंत्री विष्णू सवरा यांनी न दाखवल्याबद्दल शेतकरी व ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप आहे.
या प्रारुप आराखड्यात आपल्या आरक्षण येत असल्याने शेती शिल्लकच रहात नसल्याचे कारण देत आपल्या शेती अवजारांसह प्रारुप विकास आराखड्याविरोधात आंदोलन केले होते. स्थानिकांचा हा आक्रोश पालकमंत्र्याना ऐकू जाऊ नये या बद्दलही संताप व्यक्त केला जात होता.
पालघर लोकसभेचे खासदार अॅड. चिंतामण वनगा यांनी बाधीत शेतकऱ्यांसह पाडे गावांना भेटी देत ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले होते. व चुकीच्या प्रारुप विकास आराखड्याविरोधात आपण लोकांबरोबर आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर करत मुख्यमंत्र्यांची शिष्टमंडळाशी भेट घडवून आणणार असल्याचे जाहीर केले होते. तर माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत, आ. आनंद ठाकूर, आ. कृष्णा घोडा यांनी या उपोषणाला आपला पाठिंबा जाहीर केला होता.
(वार्ताहर)