जेएनयूमधील हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यभर निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 04:42 AM2020-01-07T04:42:52+5:302020-01-07T04:43:04+5:30
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचे पडसाद राज्यात सोमवारी उमटले.
मुंबई : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचे पडसाद राज्यात सोमवारी उमटले. रविवारी मध्यरात्री मुंबईत गेट वे आॅफ इंडिया येथे विद्यार्थ्यांनी कॅण्डल मार्च काढत या हल्ल्याचा निषेध केला, तर आयआयटी बॉम्बे येथेही विद्यार्थ्यांनी निषेध नोंदविला. सोमवारी पुन्हा विविध संघटना, विविध शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य यांच्यासह नागरिकांनी आंदोलन केले. विद्यार्थी संघटनांनी सोमवारी मराठवाड्यात ठिकठिकाणी आंदोलन केले. औरंगाबादेत एनएसयूआय संघटनेने विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर तोंडावर काळी पट्टी बांधून आंदोलन केले, तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप कार्यालयासमोर आंदोलन केले. देवगिरी महाविद्यालयाच्या समोर एबीव्हीपीच्या पदाधिकाऱ्यांनीही हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन केले.
परभणीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने निषेध नोंदविला. जालना येथे विद्यार्थी, युवक, नागरिक संघर्ष समितीतर्फे गांधी चमन येथे निदर्शने करण्यात आली. हिंगोलीत विद्यार्थी संघटनांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.
नाशिक, जळगावला तणाव
नाशिक : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अभाविपच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. अभाविप व राष्ट्रवादी युवकचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. धुळ््यात सत्यशोधक विद्यार्थी संघटनेकडून निषेध व्यक्त करण्यात आला़ जळगावला मू.जे. महाविद्यालयात अभाविप आणि पुरोगामी विद्यार्थी संघटनांनी
निदर्शने केली. दोन्ही संघटना समोरासमोर आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
‘भाजप गो बॅक’च्या घोषणा
सातारा : सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ‘भाजप गो बॅक’च्या घोषणा देण्यात आल्या. फॅसिस्ट हुकूमत उघडपणे काम करू लागल्याचा यातून निष्कर्ष निघतो, असा आरोप श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केला.
सोलापुरात घोषणाबाजी
सोलापूर : भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ, विद्यार्थी आघाडी, सोलापूर विद्यार्थी काँग्रेस व एनएसयूआयच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला़ येथील चार हुतात्मा पुतळ्यासमोर निदर्शने करून विद्यार्थ्यांनी हल्ल्याच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली़
>पुण्यात निर्धार सभा
>पुणे : भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शहरात विविध ठिकाणी विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत निर्धार सभा घेतली.
फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) विद्यार्थ्यांनी रविवारी रात्रीच आंदोलन केले. त्यानंतर सोमवारी दिवसभरात विविध संस्था- संघटना, राजकीय पक्ष आणि विद्यार्थी संघटनांंनी या हल्ल्याचा वेगवेगळ्या पद्धतीने निषेध नोंदविला.
>सांगलीत काँग्रेसची निदर्शने
सांगली : हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी सांगलीत काँग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा देत, हा भाजपचा डाव असल्याचा आरोप केला. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नगरसेवक मंगेश चव्हाण आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले.