वकिलाच्या गणवेशात केलेले आंदोलन भोवले; सदावर्ते यांची सनद दोन वर्ष निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 06:28 AM2023-03-29T06:28:06+5:302023-03-29T06:28:13+5:30
ॲड. सुशील मंचरकर यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलने सदावर्ते यांच्यावर कारवाई केली.
मुंबई : महाराष्ट्र आणि बार कौन्सिलने ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का दिला आहे. गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आली आहे. वकिली आचारसंहितेचे उल्लंघन आणि वकिलाच्या गणवेशात असतानाही आंदोलनात सहभागी झाल्याचा ठपका सदावर्ते यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
ॲड. सुशील मंचरकर यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलने सदावर्ते यांच्यावर कारवाई केली. बार कौन्सिलने शिस्तभंगाच्या कारवाईप्रकरणी बजावलेल्या नोटिशीला सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. बार कौन्सिलच्या या निर्णयामुळे सदावर्ते यांना दोन वर्षे वकिलीचा सराव करता येणार नाही. ते दोन वर्षे न्यायालयात कोणाचीही बाजू मांडू शकत नाही.
असे आहेत आरोप
तक्रारीनुसार, गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान वकिलांचा गणवेश आणि बँड घालून आझाद मैदानात जल्लोष केला होता. तसेच त्यानंतर झालेल्या बैठकीतही वकिलांचा गणवेश परिधान करूनच ते सहभागी झाले होते. त्यांच्या या कृतीमुळे वकिलांच्या आचारसंहितेचे उल्लंघन झाले.