मुंबई : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांना विरोध दर्शविण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने संपूर्ण देशभरात गुरुवारी रेल रोकोची हाक देण्यात आली होती. याच रेल रोकोच्या समर्थनार्थ मुंबईत गुरुवारी दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा, महाराष्ट्रच्या वतीने निदर्शने करण्यात आली. या वेळी विविध शेतकरी व कामगार संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनात उपस्थित आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्याचप्रमाणे कृषी कायद्यांना विरोध करणारे फलकदेखील झळकवण्यात आले. केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांवर अन्याय करणारे असून केवळ मोजक्या उद्योगपतींना या कायद्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे जोपर्यंत केंद्र सरकार हे कायदे रद्द करीत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला. या वेळी दादर पूर्व रेल्वे स्थानकाच्या बाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाची दादर स्थानकाबाहेर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 4:10 AM