मुंबई - यूपीएससी परीक्षेत ठाण्यातील डॉ. कश्मिरा संखे यांनी राज्यात प्रथम आणि देशात २५ वा क्रमांक मिळवत ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. मेहनत, जिद्द आणि आई-वडिलांच्या पाठिंब्याच्या जोरावर हे यश संपादन केल्याचे मत कश्मिरा यांनी व्यक्त केले. यंदा महाराष्ट्रातील ७० हून अधिक उमेदवारांनी या परीक्षेत झेंडा रोवला. अनेकांनी मोठ्या कष्टातून, हालाकीच्या परिस्थितीतून आणि जिद्दीने हे यश मिळवले. विशेष म्हणजे यंदाच्या युपीएससी परीक्षेत मुख्यमंत्री फेलोशीप योजनेत २०१८ साली काम करणाऱ्या पल्लवी सांगळे हिनेही बाजी मारली. या यशाबद्दल मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी तिचे फोन करुन कौतुक केले.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रातील ७०हून अधिक उमेदवार यशस्वी झाले आहेत. यंदाच्या यशवंतामध्ये राज्याचा १२ टक्के वाटा आहे. ठाण्यातील कश्मिरा या परीक्षेत राज्यात पहिली असून ती डेन्टिस्ट आहे. आपला व्यवसाय सांभाळून तिने हे यश संपादन केले. त्यांनी आतापर्यंत तीन वेळा यूपीएससी परीक्षा दिली. प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीप्रमाणे त्यांनी यावेळी यशस्वी गरुडभरारी घेतली. विशेष म्हणजे या परीक्षेत सीएम फेलोशीप २०१८ च्या बॅचची विद्यार्थीनी पल्लवी सांगळे हिनेही दैदिप्यमान यश मिळवले. या यशाबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिचे फोन करुन व्हेरी वेल डन म्हणत तिचे अभिनंदन केले. तसेच, त्यावेळीही तुम्ही सगळ्यांनी खूप चांगलं काम केलं होतं. मला खूप आनंद झालाय, ऑल द बेस्ट.. असे म्हणत फडणवीसांनी आपल्यासोबत काम केलेल्या विद्यार्थींनीचं युपीएससीतील यशाबद्दल कौतुक केलं.
पल्लवी सांगळे हिने यंदाच्या युपीएससी परीक्षेत ४५२ वी रँक मिळवत हे यश प्राप्त केले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून २०१८ साली सीएम फेलोशीप योजना सुरू करण्यात आली होती. नव्या पिढीतील युवकांना प्रशासकीय सेवेचा अनुभव मिळवून देण्यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आली होती. आज, त्याच सेवा योजनेतील पल्लवी सांगळे हिने युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत या उप्रकमाचं हे यश असल्याचं दाखवून दिलं.