मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या दसरा मेळाव्याच्या निधीची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकादाराला त्याची विश्वासार्हता सिद्ध करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने बुधवारी दिले.
एकनाथ शिंदे यांनी मेळाव्यासाठी खर्च केलेल्या निधीचा स्रोत काय? याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कांदिवलीचे रहिवासी दीपक जगदेव यांनी जनहित याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवरील सुनावणी प्रभारी मुख्य न्या. नितीन जामदार व न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर होती.
बुधवारच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने म्हटले की, याचिकादाराची विश्वासार्हता सिद्ध झाली तरच याचिकेवर सुनावणी घेऊ. ‘याच एका आधारावर आम्ही याचिका फेटाळू शकतो. मात्र, याचिकदाराबाबत संपूर्ण माहिती सादर करण्याची हमी वकील देत असल्याने आम्ही त्यांना संधी देत आहोत,’ असे न्यायालयाने म्हटले.
दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून दोन लाख कार्यकर्ते आले होते. त्यासाठी राज्यभरातून १७०० एस.टी. मुंबईला आल्या. त्यासाठी १० कोटी रुपये शिंदे यांनी एमएसआरटीसीला दिले. या कार्यक्रमासाठी खर्च करण्यात आलेला निधी कुठून आला? याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जगदेव यांनी केली आहे.
एकनाथ शिंदे हे अमान्यताप्राप्त सरकारचे मुख्यमंत्री आहेत. सीबीआय, ईडी व मुंबई इओडब्ल्यूने त्यांची चौकशी करावी, अशीही मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. यापूर्वीच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने जगदेव यांना रिट याचिकेचे जनहित याचिकेत रूपांतर करण्याचे निर्देश दिले होते.