लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम यशस्वी रीत्या चालू आहे. मात्र, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आज लसींचा तुटवडा भासत आहे. खास करून मुंबईत लोक कामाला बाहेर पडण्यासाठी लसीकरण करून घ्यावे म्हणून लसीकरण केंद्रावर धाव घेतात; परंतु मुंबईत लसीचे डोस पुरेसे प्रमाणात येत नसल्याने लसीकरण केंद्रावर लांब रांग लागत असून मुंबईत खूप संथगतीने लसीकरणाची प्रक्रिया मुंबईत सुरू आहे.
उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांना सविस्तर पत्र लिहून मुंबई शहराची लसीकरणाबाबतीत सद्य:स्थिती दर्शवली आहे. मुंबईला मुबलक प्रमाणात लस उपलब्ध करून द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुंबईच्या लोकसंख्येच्या तुलनेत लसीच्या डोसची व्यवस्था करण्यात महाराष्ट्र आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरली आहे. मुंबईची लोकसंख्या दोन कोटींच्या आसपास असून १८ वयोगटाच्या वरील ५० टक्के नागरिक लसीचे दुसरे डोस घेण्यासाठी पात्र आहेत; परंतु लसीचा साठा कमी असल्याने फक्त १५ ते २० टक्के पात्र लोकांना लसीकरण शक्य झाले आहे, अशी मुंबई शहराची लसीकरणाबाबतची सद्य:स्थिती खासदार गोपाळ शेट्टी यांनी पत्रात नमूद केली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक लसीकरण केंद्रात १०० डोस दैनंदिन पातळीवर येत आहेत. खर म्हणजे मुंबईची लोकसंख्या बघता लसींची संख्या अत्यंत कमी आहे. हळूहळू मुंबईत रोजगार, आस्थापना खुले होत असताना नागरिकांना लसीकरण करून घेण्याची तातडीने गरज आहे. मात्र, मुंबईकरांचे सक्षमपणे लसीकरण करण्यात राज्य सरकारची यंत्रणा अपुरी पडत आहे. मुंबईकरांचे लसीकरण करणे ही राज्य सरकारची संपूर्ण जबाबदारी आहे. आपण याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र दिले होते. मात्र, त्यांनी साधे उत्तर दिले नसल्याबद्दल खासदारांनी नाराजी व्यक्त केली.