हॉस्पिटल्सना पुरेसा लससाठा उपलब्ध करून द्या; टास्क फोर्सची राज्य सरकारला सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 06:40 AM2023-03-30T06:40:00+5:302023-03-30T06:40:11+5:30
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची राज्य सरकारला सूचना
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याचे आढळून आल्याने राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. वाढत्या बाधितांची संख्या लक्षात घेत मंगळवारी टास्क फोर्सची तातडीची बैठक झाली. त्यात राज्य सरकारने रुग्णालयांना लससाठा उपलब्ध करून देण्याची महत्त्वपूर्ण सूचना करण्यात आली आहे. अनेक रुग्णालयांत बूस्टर डोसची डोसची मागणी होत असताना पुरेसा लससाठाच उपलब्ध नसल्याचे चित्र आहे.
देशभरात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढायला लागली आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण जास्त आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे आदेश गेल्याच आठवड्यात दिले आहेत. विशेष म्हणजे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना एच १ एन १ आणि एच ३ एन २ या आजाराने ग्रस्त असलेल्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. कोरोना आणि या इन्फ्लुएंझा ए विषाणूमुळे होणाऱ्या आजारांची लक्षणे सारखीच आहेत. दोन्ही आजारांत खोकला, सर्दी, ताप आणि श्वास घेण्यास त्रास ही लक्षणे आढळतात.
सद्य:स्थिती काय?
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात कोरोनाचे २,५०६ सक्रिय रुग्ण आहेत. यात अनेक रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासत नसून राज्यातील मृत्यूदर १. ८२ टक्के एवढा अत्यल्प आहे. इन्फ्लुएंझा ए च्या रुग्णांवरही आरोग्य विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे कोरोनासोबत इन्फ्लुएंझा ए विषाणूबाधित रुग्णाचे नियोजन आरोग्य विभाग करत आहे. तसेच चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे.
टास्क फोर्सच्या बैठकीत कोरोनासंदर्भातील सद्य:स्थितीचा आढावा घेण्यात आला. घाबरण्याची गरज नसली तरी सतर्क राहणे गरजेचे आहे. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले आहे, मात्र अजूनही बऱ्याच नागरिकांना बूस्टर डोस घेणे बाकी आहे. अनेक रुग्णालयांत लस उपलब्ध नाही. ती सरकारने उपलब्ध करून द्यावी. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे लोकांनी टाळावे. रुग्णालयात काम करणाऱ्या सर्व डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करावा. सर्व रुग्णालयांनी दक्ष राहावे.
- डॉ. संजय ओक, राज्य कोरोना कृती दलाचे अध्यक्ष
केंद्रीय आरोग्य खात्याकडून ज्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यांचे काटेकोर पालन राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील अधिष्ठातांनी करावे, अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. - राजीव निवतकर, आयुक्त, वैद्यकीय शिक्षण विभाग