मूलभूत सुविधा पुरवा, तरच मत मागायला या..!, निवडणुकांवर टाकणार बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 02:05 AM2017-11-21T02:05:34+5:302017-11-21T02:06:03+5:30
मुंबई : दहिसरच्या गणपत पाटील नगरचे रहिवासी, तसेच त्यांच्या झोपड्या अनधिकृत असल्याचे सांगत, स्थानिक राजकारणी त्यांना मूलभूत सोयीपासून वंचित ठेवत आहेत. परिणामी
मुंबई : दहिसरच्या गणपत पाटील नगरचे रहिवासी, तसेच त्यांच्या झोपड्या अनधिकृत असल्याचे सांगत, स्थानिक राजकारणी त्यांना मूलभूत सोयीपासून वंचित ठेवत आहेत. परिणामी, यावर जर आम्ही अपात्र आहोत, तर निवडणुकीच्या वेळी आमची मते पात्र कशी काय असू शकतात? असा सवाल येथील रहिवाशांनी विचारला असून, सुविधा देईपर्यंत एकाही राजकारण्यांनी या परिसरात पाऊल ठेवू नये, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
वीज, पाण्यासारख्या मूलभूत सुविधांसाठी गेल्या कित्येक वर्षांपासून गणपत पाटील नगर वंचित आहे. नुकतेच या परिसरात भारतीय जनता पक्षाच्या आमदार मनिषा चौधरी, तसेच शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी दोन वेगवेगळ्या कंपन्यांचे अर्ज वितरित केले. त्यामुळे त्यांच्यात सतत वाद होत असून, या विरोधामुळे गणपत पाटील नगरमधील नागरिकांवर अंधारात राहण्याची वेळ आली आहे. याचा निषेध म्हणून सामाजिक कार्यकर्ते राम यादव यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी गणपत पाटील नगरच्या ४०० ते ५०० नागरिकांनी एकदिवसीय उपोषण करत, त्यांचा राग व्यक्त केला. स्थानिक लोकप्रतिनिधी फक्त आश्वासन देतात. मात्र, प्रत्यक्षात अंमलबजावणी करत नाहीत. त्यामुळे या सुविधा पुरवित समस्या सोडविल्या नाहीत, तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे स्थानिक रहिवाशी रेश्मा शिंदे यांनी सांगितले. आमच्याकडे दुर्लक्ष केले, तर निवडणुकीत आम्ही संबंधितांकडे पाठ फिरविणार, असे रहीम शेख यांनी सांगितले.