Join us

मच्छीमारांना आर्थिक मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान झाल्याने त्यांची आर्थिक स्थिती बिघडली असून, त्यांना शासनाने आर्थिक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान झाल्याने त्यांची आर्थिक स्थिती बिघडली असून, त्यांना शासनाने आर्थिक मदत करावी. तसेच पावसाळी मासेमारीबंदीचा कालावधी हा १ जून ऐवजी १० जून करावा, अशी विनंती वर्सोवा विधानसभेचे आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्रकाद्वारे केली आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे मच्छीमारांचे आर्थिक नुकसान झाले असून, या वादळात अनेकांच्या बोटींचे तुकडे तुकडे झाले आहेत. ज्या बोटी वाचल्या त्यांच्या इंजिनमध्ये पाणी गेल्याने इंजिन बंद पडले आहे, तर जाळ्या व सुकी मासळी व बांबू वाहून गेले आहेत. अगोदरच एलईडी लाइटच्या मासेमारीमुळे मच्छीमार बेजार झाला असून, गेल्या अनेक दिवसांपासून मच्छीमारांना मासेमारी करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे ही वस्तुस्थिती आहे. कोरोनाकाळात आलेली वेगवेगळी चक्रीवादळे, अवकाळी पाऊस यामुळे मच्छीमार समाज मेटाकुटीस आला आहे. मासळी पकडण्याचा खर्च जास्त व उत्पन्न कमी मिळत असल्याची कैफियत आमदार डॉ. लव्हेकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात मांडली आहे.

मत्स्य विभागाने १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारी बंद करण्याचे आदेश जारी केल्याने आता जगायचे कसे, असा मोठा प्रश्न मच्छीमारांना पडला असून, गेल्या २५ महिन्यांपासून मच्छीमारांना शासनाकडून डिझेलचा परतावा मिळाला नसून, तो त्वरित द्यावा.

तौक्ते वादळात मच्छीमारांचे ८-१० दिवस वाया गेले आहेत. मत्स्य विभागाने दि. १ जून ते दि. ३० जुलै मासेमारी बंद ठेवण्याचे जे आदेश दिले आहेत त्यात बदल करून दि. १० जून ते दि. १० ऑगस्टपर्यंत करावा आणि मासेमारी करण्यास मच्छिमारांना १० दिवसांची मुदत वाढवून द्यावी ही बाबदेखील आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केली आहे.

--------------------------------