‘महापरिनिर्वाण दिनी अनुयायांना निवा-याची सुविधा द्या’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 02:26 AM2017-11-23T02:26:55+5:302017-11-23T02:26:58+5:30
शिवाजी पार्कव्यतिरिक्त लगत असलेल्या मैदानांतही अनुयायांसाठी निवा-याची सुविधा पुरविणे आवश्यक असून त्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करावी, अशी सूचना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली.
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातील लाखो अनुयायी बाबासाहेबांसमोर नतमस्तक होण्यासाठी चैत्यभूमी येथे येत असून त्यांची वाढती संख्या लक्षात घेता शिवाजी पार्कव्यतिरिक्त लगत असलेल्या मैदानांतही अनुयायांसाठी निवा-याची सुविधा पुरविणे आवश्यक असून त्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करावी, अशी सूचना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली.
चैत्यभूमी स्मारक (दादर पश्चिम) येथे पुरविण्यात येणाºया विविध नागरी सेवा-सुविधांबाबत विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात पालिकेतील पदाधिकारी, अधिकारी, पोलीस अधिकारी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी यांची संयुक्त बैठक आयोजित केली, या वेळी ते बोलत होते. सर्वपक्षीय नगरसेवकांना सोबत घेऊन महापौरांच्या अध्यक्षतेखाली व सामाजिक संघटनांच्या सहभागातून नव्याने महापरिनिर्वाण दिन समन्वय समिती गठित करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
सभागृह नेते यशवंत जाधव म्हणाले की, जी/उत्तर विभागातर्फे वितरित करण्यात येणाºया स्टॉलमध्ये कंत्राटदारांकडून अतिरिक्त शुल्क आकारण्यात येत असून ते शुल्क आकारू नये, अशी सूचना प्रशासनाला केली आहे. हे स्टॉल ७ डिसेंबरपर्यंत कायम ठेवण्याची सूचनाही त्यांनी केली. वरळीच्या जांभोरी मैदान किंवा आंबेडकर मैदानात अनुयायांसाठी अतिरिक्त निवासाची व्यवस्था करण्याची सूचना त्यांनी केली.
दादर स्थानकापासून वरळी स्माशनभूमीतील माता रमाई स्मृतिस्थळ व राजगृहापर्यंत
बेस्ट बसची सुविधा उपलब्ध करण्याची सूचना करत बसस्टॉपवरील फलकातून आकारण्यात येणाºया टॅक्समधून सूट देण्याची मागणी त्यांनी केली.