मनोहर कुंभेजकर
मुंबई: बोरिवली खाडीपलीकडे असलेल्या गोराई व लगतच्या कुलवेम व मनोरी या सुमारे 18000 लोकसंख्येच्या गावांना आजही स्वातंत्र्याच्या 73 वर्षांनंतर आरोग्य,शिक्षण,पाणी या मूलभूत सुविधा नाही.याभागाकडे ना पालिकेने लक्ष दिले ना शासनाने लक्ष दिले नाही.
राज्यातील आदिवासी बांधवांसाठी काम करणाऱ्या अभिषेक सामाजिक व शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सुनीता नागरे व गोराई रिसोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष जोरम राजा कोळी यांनी येथील गोराई गावातील आणि आदिवासी पाड्यातील समस्यांवर प्रकाशझोत टाकला होता. या संदर्भात लोकमत ऑनलाईन व लोकमतच्या दि,8 डिसेंबरच्या अंकात या संदर्भात सविस्तर वृत्त दिले होते.
लोकमतच्या वृत्ताची दखल घेऊन राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी नुकतीच गोराई गावाला भेट दिली. यावेळी आर मध्य विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.बाबासाहेब कवळी,गोराई मथाई चर्चचे फादर एडवर्ड जसिंतो, गोराई मच्छिमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष जोजफ कोलासो,सचिव रॉकी किणी,जोरम राजा कोळी,सुनीता नागरे आदी मान्यवर उपस्थित होते.
गोराई मच्छिमार सहकारी सोसायटीत झालेल्या बैठकीत फादर एडवर्ड जसिंतो, जोजफ कोलासो यांनी येथील असुविधांचा पाढाच डॉ.दीपक सावंत यांच्याकडे मांडला.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील गोराई व लगतच्या कुलवेम व मनोरी ही तीन गावे मूलभूत व आरोग्य सुविधांपासून वंचित ठेवले आहे.आजही येथे सुसज्ज हॉस्पिटल नाही,ऍम्ब्युलन्सची व बाळांतपणाची व डायलिसिसची सुविधा नाही. जर इमरजन्सीत कोणतीही आरोग्य समस्या उद्भवल्यास येथील नागरिकांना बोरिवलीला 20 ते 25 किमी वळसा घालून जावे लागते. यामध्ये नागरिकांचा प्राण गेल्याच्या घटना घडल्या आहेत.गोराई गावात पालिकेचा दवाखाना आहे.सदर दवाखाना सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत सुरू असतो.त्यानंतर जर आरोग्य समस्या उद्भवल्यास डॉक्टर नसल्याने औषध उपचार होत नाही.त्यामुळे येथे 24 तास डॉक्टरची नितांत गरज आहे. येथे 50 बेडचे सुसज्ज हॉस्पिटल बांधण्याची मागणी त्यांनी केली.
येथील पालिकेचा दवाखान्याची जागा ही 1930 ची असून सदर जागा ही सीआरझेड मध्ये मोडत असल्याने दुरुस्ती करता येत नाही. पावसाळ्यात येथे पाणी तुंबत,त्यामुळे सदर वास्तूची दुरुस्ती करणे गरजेचे आहे अशी माहिती येथील डॉक्टरांनी डॉ.सावंत यांना दिली.
पालिकेचा 2034 च्या नव्या डीपीत येथील कोळीवाडे अधोरेखित केले नाही. येथील नागरिकांना पाणी जोडणी हवी असेल आणि घर बांधणी करायची असेल तर पालिका पुरावा मागते. येथे कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने पाण्याची जोडणी ही मनोरी ऐवजी बोरिवलीतून देण्याची मागणी फादर एडवर्ड जसिंतो, जोजफ कोलासो यांनी केली. येथील सहा आदिवासी पाड्यांतील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाही. आम्हाला सी आरझेड कायद्याचा बडगा दाखवला जातो मात्र येथील वसलेल्या एसेलवर्ल्ड व पागोडाला मात्र सर्व सुविधा दिल्या जातात असा आरोप त्यांनी केला.
गोराई गावात 10 वी पर्यंत तर मनोरी गावात चौथी पर्यंत शाळा आहे. येथे लॉ कॉलेजसाठी भूखंड राखीव होता. मात्र कॉलेज काही झाले नाही. येथें महाविद्यालयाची नितांत गरज आहे.
याप्रकरणी डॉ.दीपक सावंत यांनी येथे पालिका प्रशासन व राज्य सरकारने पुढाकार घेऊन 24 तास ऍम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध करून द्यावी, नागरिकांना आरोग्य सुविधा व महिलांना बाळंतपणाची सुविधा मिळण्यासाठी 24 तास डॉक्टर व सहाय्यक मेड नर्सची सुविधा उपलब्ध करून द्यावी,येथे डायलिसिसची सुविधा तसेच सुसज्ज हॉस्पिटलची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आपण येथील समस्यांचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याचे पर्यटन मंत्री व उपनगरचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे सादर करणार असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.