मुंबई : खरीप हंगामासाठीच्या कर्ज घेण्यात शेतकऱ्यांंना अडचण येता कामा नये त्यांना तत्काळ कर्ज उपलब्ध करून द्या, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत दिले.
ज्या शेतकºयांचे आधीचे पीककर्ज थकीत असेल, त्यांना राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे या शेतकºयांनाही पीक कर्ज देण्यात यावे, त्यांचे थकीच पीक कर्ज भरण्याची हमी राज्य शासनाने कर्जमुक्ती योजनेतून घेतली आहे, अशी ग्वाही ठाकरे यांनी बँकांना दिली. व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दादाभुसे, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, मुख्य सचिव अजोय मेहता आणि वरिष्ठ अधिकारी तसेच रिझर्व बँक नाबार्डचे व अन्य बँकांचे अधिकारी उपस्थित होते.
यंदाचा पावसाळा समाधानकारक असेल असा अंदाज आहे. कोरोनाच्या काळात शेतकरीही मोठ्या संकटात आला आहे. पुढील हंगामासाठी शेतकºयाला आपण सर्वांनी मिळून साथ देऊया. सर्वजण मिळून कोरोनाच्या संकटावर मात करुया, असे आवाहन त्यांनी केले.