Join us  

वीजचोरीची माहिती द्या; ५० हजार मिळवा

By admin | Published: April 03, 2017 2:34 AM

मुंबई शहरातील वीजचोरांवर अंकुश आणण्यासाठी बेस्ट उपक्रम नेहमीच प्रयत्नशील राहिला आहे

मुंबई : मुंबई शहरातील वीजचोरांवर अंकुश आणण्यासाठी बेस्ट उपक्रम नेहमीच प्रयत्नशील राहिला आहे. वीजचोरीमुळे होणारे उपक्रमाचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. या संदर्भात थेट जोडणी, मीटरमधील फेरफारद्वारे वीजचोरीची माहिती देणाऱ्या व्यक्तींना रोख पारितोषिक देण्यासाठी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. वीजचोरीचे प्रकरण पूर्ण निकाली निघाल्यानंतर, अंतिम वीजचोरी दावा रक्कमेच्या वसुलीनंतर, सदर व्यक्तीस अंतिम दावा रकमेच्या ५ टक्के किंवा ५० हजार इतकी रक्कम वितरित करण्यात येईल, अशी माहिती बेस्टकडून देण्यात आली.बेस्टच्या योजनेंतर्गत उपक्रमाच्या सेवकवर्ग व कुटुंबीयांव्यतिरिक्त कोणीही व्यक्ती वीजचोरीबद्दल बेस्ट उपक्रमाच्या दक्षता विभागास माहिती देऊ शकते. मिळालेल्या माहितीप्रमाणे, वीजचोरी प्रकरण सिद्ध झाल्यास, माहिती देणाऱ्या व्यक्तीस वीजचोरी दावा रकमेच्या १ टक्के अथवा ५ हजार इतकी रक्कम पहिला हफ्ता म्हणून तातडीने देण्यात येईल. सदर प्रकरण पूर्ण निकाली निघाल्यानंतर, अंतिम वीजचोरी दावा रकमेच्या वसुलीनंतर, सदर व्यक्तीस अंतिम दावा रकमेच्या ५ टक्के किंवा ५० हजार इतकी रक्कम वितरित करण्यात येईल. सदर पारितोषिकाची रक्कम २० हजार व त्यापेक्षा जास्त असल्यास, वरील माहिती देणाऱ्या व्यक्तीस चेकने किंवा आॅनलाइन ट्रान्सफर (आरटीजीएस/एनईएफटी)ने देण्यात येईल. वीजचोरीची माहिती देणाऱ्या व्यक्तीची माहिती गोपनीय राहील. वीजचोरीची माहिती देणे सुलभ व्हावे, याकरिता बेस्ट उपक्रमाच्या संकेत स्थळावर लिंक देण्यात आली आहे, तसेच सध्या वीजचोरीची माहिती बेस्ट उपक्रमाच्या दक्षता (विद्युतपुरवठा) या विभागात प्रत्यक्ष, पत्र अथवा ई-मेलद्वारे कार्यालयीन वेळेत (सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत) देता येईल. (प्रतिनिधी)>पोटमाळ्यास स्वतंत्र वीजजोडणीमुंबई शहर विभागात बेस्ट उपक्रमाच्या हद्दीतील झोपडपट्ट्या/चाळीतील खोल्यांना मोठ्या प्रमाणात पोटमाळे आहेत. कुटुंबाच्या वाढत्या आकारामुळे पोटमाळ्यावर वेगळे स्वतंत्र कुटुंब राहणे क्रमप्राप्त होते. या अशा स्वतंत्र जीना मार्ग असणाऱ्या पोटमाळ्यावर राहाणाऱ्या कुटुंब वा व्यक्तींसाठी वेगळी स्वतंत्र वीजजोडणी नसल्याने, त्या ठिकाणी होणारा विजेचा अनधिकृत वापर व चोरीच्या घटना आढळून आल्या आहेत. या प्रकारांमुळे उपक्रमाचे आर्थिक नुकसान तर होतेच, त्याचबरोबर सदर अनधिकृत वीजजोडणीतून विजेचा धक्का, शॉर्टसर्किट, आग आदी धोके संभवतात व संबंधित रहिवाशांच्या जिवास व मालमत्तेस गंभीर धोका संभवतो. त्यामुळेच उपक्रमाकडून यापुढे स्वतंत्र वीजजोडणी मंजूर करण्यात येणार आहे. पोटमाळा उपक्रमाच्या नियम/विनियमांतर्गत वीजजोडणीसाठी पात्र असल्यास, जागेचा मालकी पुरावा अथवा ओळखीचा पुरावा सादर केल्यास, त्याला वीजजोडणी मंजूर करण्यात येईल.