प्रदूषण नियंत्रणासाठी काय केले त्याची माहिती द्या; कोस्टल रोड अधिकाऱ्यांना MPCBच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 07:45 IST2025-01-07T07:45:20+5:302025-01-07T07:45:46+5:30
प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर पावले उचललेली असताना एमपीसीबीकडून पालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पालाच कारणे दाखवा नोटीस बजावली आहे

प्रदूषण नियंत्रणासाठी काय केले त्याची माहिती द्या; कोस्टल रोड अधिकाऱ्यांना MPCBच्या सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: प्रदूषण नियंत्रणासाठी पालिका काय उपाययोजना करीत आहे याची माहिती कोस्टल अधिकाऱ्यांनी सादर करावी अशा सूचना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (एमपीसीबी) प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर पावले उचललेली असताना एमपीसीबीकडून पालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पालाच कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकरणी सोमवारी पालिकेचे अधिकारी, कंत्राटदार यांना सुनावणीसाठी बोलवण्यात आले होते.
मुंबईतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका व एमपीसीबी कठोर पावले उचलली आहेत. मात्र, पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पाच्या ठिकाणी प्रदूषण नियंत्रणाचे नियम पाळले जात नसल्याचे एमपीसीबीच्या पाहणीच्या वेळी आढळून आले होते. त्यामुळे या प्रकल्पाला पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत एमपीसीबीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यापुढे प्रकल्पाच्या ठिकाणी वेळोवेळी पाणी फवारणी करणे, तसेच राडारोड्याचे व्यवस्थापन करणे अशा उपाययोजना कराव्यात, असेही सूचनांमध्ये म्हटले आहे.
उत्तर दाखल करणार
कोस्टल रोड प्रकल्पाच्या ठिकाणी सर्व नियमांचे पालन होत आहे, मात्र त्यावर आणखी बारकाईने लक्ष ठेवले जाऊन कंत्राटदारांना आवश्यक त्या प्रक्रिया करण्याच्या सूचना आम्ही करीत आहोत अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली. आम्ही राबवीत असलेल्या उपाययोजनेची संपूर्ण माहिती मंडळाला आम्ही सादर करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.