वारकऱ्यांना रेनकोट पुरवा, डबेवाल्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 02:29 AM2018-06-26T02:29:29+5:302018-06-26T02:29:32+5:30
प्लॅस्टिकबंदीचा फटका वारकऱ्यांना बसू नये, याकरिता मुंबईच्या डबेवाल्यांनी पुढाकार घेतला आहे.
मुंबई : प्लॅस्टिकबंदीचा फटका वारकऱ्यांना बसू नये, याकरिता मुंबईच्या डबेवाल्यांनी पुढाकार घेतला आहे. वारीच्या मार्गात पावसाचा फटका बसतो, त्यामुळे बरेच वारकरी प्लॅस्टिक अंगावर घेतात. मात्र, या प्लॅस्टिकमुळे वारकरी अडचणीत येऊ शकतात, हेच टाळण्यासाठी वारकºयांना रेनकोट किंवा अन्य पर्यायी व्यवस्था करा, अशी मागणी राज्य शासनाकडे केली आहे.
पावसापासून बचाव करण्यासाठी गरीब वारकरी २० रुपयांचे प्लॅस्टिक कवच डोक्यावर घेतो. प्लॅस्टिक बाळगल्यामुळे जर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली, तर ‘होईल भिकारी पंढरीचा वारकरी,’ अशी परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती डबेवाले संघटनेचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी व्यक्त केली आहे.
त्यामुळे लवकरच या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविणार असल्याचेही तळेकर यांनी सांगितले.
५०० डबेवाले सहकुटुंब वारीला जाणार
यंदाही डबेवाले सुट्टी काढून विठुरायाच्या दर्शनासाठी वारीला जाणार आहेत. एकादशीच्या आदल्या दिवशी डबेवाले संघटनेकडून १० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. एक दिवस सुट्टी घेऊन काही डबेवाले सहकुटुंब वारीला जातील. एका बसधून ५० सदस्य, यानुसार १० बसेसमधून साधारण ५०० डबेवाले यंदा सहकुटुंब वारीला जाणार आहेत.