Join us

"पवईतील जयभीमनगरमधील ६०० मागासवर्गीय बेघर कुटुंबांच्या निवाऱ्याची त्याच ठिकाणी सोय करा", काँग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 5:47 PM

Powai Jayabhimnagar News: पवईच्या जय भीम नगरमधील घरे तोडून बेघर केलेल्या ६०० मागासवर्गीय कुटुंबांच्या तात्पुरत्या निवा-याची सोय सरकारने त्याच ठिकाणी करावी अशी मागणी माजी मंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी केली आहे.

मुंबई - पवईच्या जय भीम नगरमधील घरे तोडून बेघर केलेल्या ६०० मागासवर्गीय कुटुंबांच्या तात्पुरत्या निवा-याची सोय सरकारने त्याच ठिकाणी करावी अशी मागणी माजी मंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी केली आहे.

या संदर्भात नसीम खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. आपल्या पत्रात ते म्हणतात की, ६ जून रोजी सकाळी १० वा. महानगरपालिकेच्या एस विभागातील अधिकारी, पवई पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी व स्थानिक विकासक यांनी हिरानंदानी पवई येथील ६०० मागासवर्गीय कुटुंबियांची घरे नियमबाह्यपणे पोलिसी बळाचा वापर करून पाडली. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हजारो लोक बेघर झाले आहेत. त्यात महिला, विद्यार्थी लहान मुले मुलींचाही समावेश आहे.

हे रहिवाशी ३० वर्षापासून येथे रहात होते. त्यांच्याकडे राहण्याची कुठलीही पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे हे सगळे लोक नाईलाजाने फुटपाथवर जिथे जागा मिळेल तिथे राहात आहेत. पावसाळा सुरु झाल्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. तसेच पावसाळ्यातील साथींच्या रोगामुळे या लोकांच्या आरोग्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

या रहिवाशांनी त्यांच्यावर झालेल्या अन्याया विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली असून हे सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, त्याची सुनावणी मंगळवार 25 जून रोजी आहे.  तसेच या प्रकरणी मी स्वतः पुढाकार घेऊन रहिवाशांच्या शिष्टमंडळाची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमवेत राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली होती व त्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी केली होती. मा. राज्यपाल महोदयांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिलेले आहे. वरील सर्व परिस्थितीचा विचार करून तसेच मानवीय दृष्टीकोनातून आपण या ६०० कुटुंबियांची त्याच ठिकाणी निवा-याची सोय करावी अशी मागणी नसीम खान यांनी केली.  

टॅग्स :मुंबईनसीम खानएकनाथ शिंदे