‘राष्ट्रीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 05:56 AM2018-06-27T05:56:47+5:302018-06-27T05:56:52+5:30
केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे देण्यात येणारा ‘राष्ट्रीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार २०१८’ हा पुरस्कार यंदा राज्याच्या नशाबंदी मंडळाला प्रदान करण्यात आला आहे.
मुंबई : केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे देण्यात येणारा ‘राष्ट्रीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार २०१८’ हा पुरस्कार यंदा राज्याच्या नशाबंदी मंडळाला प्रदान करण्यात आला आहे. दिल्ली येथे मंगळवारी पार पडलेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास आणि चिटणीस अमोल मडामे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
जागतिक अमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त समाजात व्यसनमुक्तीवर कार्य करणाऱ्या संस्था, संघटना व व्यक्ती यांचा सन्मान २६ जून रोजी केला जातो. ‘नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य’च्या माध्यमातून गेल्या ५९ वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात २५ पदाधिकारी, ४० संघटक, ५०० स्वयंसेवक यांच्या अथक प्रयत्नांतून नशामुक्तीचे काम सुरू आहे.
व्यसनमुक्ती प्रचार, प्रसार आणि प्रबोधनाच्या माध्यमातून मंडळ
विविध कार्यक्रम राबवत आहे. सोबतच व्यसन करणाºयांचे समुपदेशन, उपचार केंद्रामध्ये दाखल करून त्यांना योग्य ते उपचार देऊन सातत्याने त्यांच्याशी संपर्कात राहून त्यांना व्यसनमुक्त करण्याचे कामही मंडळाने केले आहे. समाजातील व्यसनांना हद्दपार करण्यासाठी मंडळाकडून सातत्याने प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे.
या कार्याची दखल घेत केंद्र शासनाने यंदाचा ‘राष्ट्रीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार २०१८’ने मंडळाला सन्मानित केले. राष्ट्रपतींसोबत सामाजिक न्याय केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते मंडळाला गौरविण्यात आले.
या वेळी राष्ट्रपतींनी आपण सर्व व्यसनमुक्तीचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर असल्याचे मनोगत व्यक्त केले.
...आता तर खरी
कामाला सुरुवात
नशाबंदी मंडळाला राष्ट्रीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार मिळाला म्हणजे काम संपले नसून, आता तर खरी कामाला सुरुवात झाल्याची प्रतिक्रिया नशाबंदी मंडळाच्या वर्षा विद्या विलास यांनी व्यक्त केली आहे. पुरस्कारामुळे मंडळाची जबाबदारी वाढलेली असून ही जबाबदारी अविरतपणे पेलण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तर या पुरस्काराचे श्रेय नशाबंदी मंडळाचे पदाधिकारी, संघटक, स्वयंसेवक, हितचिंतक यांचे असल्याचे मत मंडळाचे चिटणीस अमोल मडामे यांनी पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केले.