मुंबई: मालाड पूर्व, कुरार गाव व परिसरातील नागरिकांना महानगरपालिकेच्या संदर्भातील कामे सहजतेने करता यावी याकरिता पी/उत्तर वार्डाचे विभाजन करून नवीन पी/पूर्व वार्डाची निर्मिती केल्याप्रकरणी व मुंबई महानगरपालिकेच्या 2021-22 च्या अर्थसंकल्पात 5 कोटी रुपये निधीची तरतूद केल्याप्रकरणी भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी आयुक्त इकबाल चहल यांचे पत्र लिहून आभार मानले आहेत.
पी उत्तर वार्डचे विभाजन करून मालाड पूर्व साठी वेगळा प्रशासकीय वॉर्ड उभारावा या मागणीसाठी मागील अनेक वर्षांपासून आमदार भातखळकर विधानसभेत आवाज उठवीत होते. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशन 2020 मध्ये त्यांनी विचारलेल्या प्रश्नांला उत्तर देताना राज्याच्या नगरविकास मंत्र्यांनी मालाड पूर्व साठी पी/पूर्व हा नवीन वॉर्ड उभारण्यास मान्यता देण्यात आल्याचे सांगितले होते.
प्रस्तावित पी पूर्व वॉर्ड साठी मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात आवश्यक निधीची तरतूद करण्याची मागणी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र लिहून केली होती. आमदार भातखळकर यांच्या मागणीला मान्यता देत आयुक्तांनी 5 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही तमाम मालाड पूर्व, कुरार गाव व परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब असून हे कार्यालय लवकरात लवकर सुरू होण्याच्या दृष्टीने पुढील आवश्यक कार्यवाही प्राधान्याने करावी, अशी मागणी सुद्धा भातखळकर यांनी आयुक्तांकडे केली आहे.