Join us  

‘लाडकी बहीण’साठी ३५ हजार कोटींची तरतूद; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 5:55 AM

महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य आहे, असे अजित  पवार यांनी म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात घोषित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी चालू आर्थिक वर्षात ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी शनिवारी एक्स या समाजमाध्यमातून दिली. 

राज्यातील माता-भगिनी-मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, पोषण आणि सर्वांगीण सक्षमीकरणासाठी, मान, सन्मान, स्वाभिमान वाढवण्यासाठी ही रक्कम खर्च करण्याची राज्य  सरकारची  तयारी आहे. त्यामुळे या योजनेला   कुणाचाही विरोध असण्याचे कारण नाही, असेही त्यांनी त्यात नमूद केले आहे.

महाराष्ट्राला एवढी रक्कम खर्च करणे शक्य 

वित्त आणि नियोजन, सर्व संबंधित विभाग, तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच या योजनेची घोषणा  अर्थसंकल्पात करण्यात आली. चालू आर्थिक वर्षात योजनेसाठी आवश्यक अशा संपूर्ण रकमेची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे या योजनेसाठी पैसा कुठून आणणार, हा प्रश्नच उद्भवत नाही. महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य आहे, असेही अजित  पवार यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसराज्य सरकार