मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्टीत रक्तदान शिबिरांची वानवा असते. परिणामी, रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा अधिक भासतो. एप्रिल ते जून महिन्यापर्यंत रक्तदान शिबिरांची संख्याच कमी असते. या काळात महाविद्यालयांनाही सुटी असते. त्यामुळे शिबिरांची संख्या घटत असल्याने रक्तसंकलन कमी प्रमाणावर होते. मात्र यावर राज्य रक्त संक्रमण शिबिरांनी तरतूद केली आहे. त्यानुसार या कालावधीत रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी आवश्यकतेनुसार रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्ताचा साठा करण्यासाठी उपाययोजना आखल्या आहेत.तीन महिन्यांत रक्ताचा तुटवडा भासतो. यासाठीच उन्हाळ्यात जास्तीतजास्त सामाजिक संस्था, धर्मादाय संस्थांनी रक्तदान शिबिरे आयोजित करून रुग्णालयांना रक्त उपलब्ध करून देण्यासाठी मदत करावी; तसेच जिल्हा स्तरावर रक्तदान करणाऱ्यांची बैठक घ्यावी, असे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेने केले आहे. ‘एसबीटीसी’द्वारे मिळालेल्या माहितीनुसार, रक्ताचा तुटवडा भासणार नाही, यासाठी जिल्हा स्वैच्छिक रक्तदान समितीने बैठक घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यामुळे उन्हाळ्यात निर्माण होणारा रक्ताचा तुटवडा दूर करण्यास मदत होईल, असा विश्वास राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून व्यक्त करण्यात येत आहे.एका महिन्यात दोन शिबिरे घेण्याच्या सूचनाराज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉ. अरुण थोरात यांनी सांगितले की, दरवर्षी १६ लाख युनिट्स रक्तसाठा होतो. मात्र उन्हाळी सुट्टीत रक्तसाठा कमी होतो. त्यासाठी या यंत्रणेतील संबंधित घटकांशी बैठक घेऊन त्यानुसार रक्तसाठ्याच्या साठवणुकीसाठी तरतूद करण्यात आली आहे. काही संस्थांना एकाच महिन्यात शिबिर आयोजित करण्याऐवजी दोन लहान शिबिरे घेण्याची सूचना करण्यात आली आहे, त्यामुळे रक्ताचा तुटवडा भासणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
उन्हाळ्यात रक्ततुटवडा भासू नये म्हणून राज्य रक्त संक्रमण परिषदेची तरतूद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 3:28 AM