ठाणे आणि भिवंडी-कल्याण मेट्रोसाठी तरतूद, एमएमआरडीएचा अर्थसंकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 01:08 AM2018-03-23T01:08:40+5:302018-03-23T01:08:40+5:30
वडाळा-कासारवडवली मेट्रोसाठी ४५० कोटी, ठाणे- भिवंडी- कल्याण मेट्रोसाठी १०० कोटींची तरतूद करणारा अर्थसंकल्प गुरूवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सादर केला.
मुंबई : वडाळा-कासारवडवली मेट्रोसाठी ४५० कोटी, ठाणे- भिवंडी- कल्याण मेट्रोसाठी १०० कोटींची तरतूद करणारा अर्थसंकल्प गुरूवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सादर केला.
मीरा-भार्इंदर, वसई-विरारसाठी महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी घसघशीत तरतूद करण्यात आली आहे. त्यातून जलस्त्रोत विकास करण्यात येणार असल्याने या भागातील दीर्घकाळ रखडलेला पाणीप्रश्न सुटण्याची चिन्हे दिसून लागली आहेत.
एमएमआरडीएच्या १२ हजार १५७ कोटींच्या अर्थसंकल्पात विविध प्रकल्पांसाठी भरघोस तरतुदी आहेत. मुंबई पारबंदर म्हणजे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठी २ हजार १०० कोटीींची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाण्यासाठी थेट मार्ग उपलब्ध होणार आहे. शिवाय मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि पुढे दक्षिण भारताकडे जाण्यासाठीही प्रकल्प उपयोगी ठरणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील तरतुदींसह मुंबई नागरी परिवहन प्रकल्पावरही प्राधिकरणाने अधिक भर दिला आहे. तसेच सात मेट्रो प्रकल्पांसाठी ४ हजार ७०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
जलस्रोत विकासासाठी ५८१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ४०३ एलएलडी सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामास सुरुवात करण्यात आली असून, याद्वारे मीरा-भार्इंदर व वसई-विरार महापालिकेसह काही गावांसाठी मुबलक पाणीपुरवठा करता येईल. सूर्या धरणातून पाणी घेत त्यावर सूर्यानगर येथे प्रक्रिया करण्यात येईल. त्यानंतर ८८ किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जाईल. या प्रकल्पाची किंमत अंदाजे एक हजार ६११ कोटी असून, या प्रकल्पाच्या कामास नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे.
रस्ते, पुलांवर लक्ष
रस्त्याचे जाळे विकसित करण्यासाठी एक हजार २९० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. फ्लायओव्हर, खाडी पूल आणि रस्त्यांचे जाळे यांच्या विकासासावर अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.
अन्य प्रकल्पांसाठी केलेली तरतूद
मुंबई नागरी पायाभूत
सुविधा प्रकल्प ६१ कोटी
बाह्य क्षेत्रातील रस्ते सुधारणा
५० कोटी
वांद्रे-कुर्ला संकुलात सुधारणा आणि नागरी सुविधा ८२.६५ कोटी
मिठी नदी विकास २० कोटी
सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्याचे कुर्ला ते वाकोला पुलापर्यंत विस्तारीकरण आणि वांद्रे-कुर्ला संकुल ते पश्चिम द्रुतगती महामार्गापर्यंत उन्नत मार्ग १८० कोटी
पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडानगर जंक्शन, घाटकोपर येथील उन्नत मार्ग सुधारणा ७० कोटी
पूर्व आणि पश्चिम द्रुतगती
मार्गाची देखभाल व दुरुस्ती १२६ कोटी
कामगार कल्याण निधी : मेट्रो प्रकल्पासाठी काम करत असलेल्या कामगारांसाठी कल्याण निधी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इजाकारक, गंभीर इजाकारक आणि प्राणघातक अपघातासाठी तसेच दुर्घटनेची माहिती उशिरा देणे अथवा ती जाणीवपूर्वक लपविणे यासाठी कंत्राटदारांना ठोठावलेल्या दंडातून हा निधी उभारण्यात येणार आहे.
मेट्रो प्रकल्पांसाठी तरतुदी
दहिसर ते डी.एन. नगर या मेट्रो-२ अ साठी १ हजार ५८८ कोटी
अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मेट्रो-७ साठी १ हजार २६२ कोटी
डी.एन. नगर ते मंडाला मेट्रो-२ ब साठी ७०० कोटी
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ साठी ५०० कोटी
वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली या मेट्रो-४ साठी ४५० कोटी
ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो-५ साठी १०० कोटी
स्वामी समर्थनगर-जेव्हीएलआर-सीप्झ-विक्रोळी या मेट्रो-६ साठी प्रत्येकी १०० कोटी
प्रकल्पाच्या जागेवर कामगारांना कंत्राटदारांने सुरक्षा पुरवावी. कोणत्याही दुर्घटनेत बळी पडलेल्या कामगाराला आणि त्याच्या परिवाराला नुकसानभरपाई मिळावी म्हणून कामगार कल्याण निधीसाठी प्रयत्न सुरू आहे. पीडित कामगार आणि त्यांच्या परिवाराला नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्राधिकरणाकडून लवकरच या धोरणाचे प्रारूप तयार करण्यात येणार आहे.
- यू.पी.एस. मदान, महानगर आयुक्त, एमएमआरडीए