लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य पोलीस दलातील बदलीसाठी इच्छुक असलेल्या उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक व पोलीस निरीक्षकांना आणखी एक संधी मिळणार आहे. गरजूच्या विनंतीनुसार सर्वसाधारण बदल्याची आणखी एक यादी येत्या शुक्रवारपर्यंत (दि.२०) जारी केली जाणार आहे.
पोलीस मुख्यालयातून चौदा ऑगस्टला राज्य पोलीस दलातील एक हजारावर अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मात्र त्यामध्ये अनेक गरजूंच्या विनंती अमान्य करण्यात आले होते. त्यामुळे उपरोक्त तीन दर्जाचे अधिकाऱ्याची सुधारित यादी जारी केली जाणार आहे. पोलीस महासंचालक संजय पांडे हे संबंधित अधिकाऱ्यांशी १७ ते १९ ऑगस्टला व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी) संपर्क साधणार आहेत. त्यानंतर रास्त असलेल्या अधिकाऱ्यांची सुधारित यादी जारी केली जाईल. मात्र मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्याचा मात्र त्यासाठी विचार केला जाणार नाही. त्यासाठी आवश्यक तांत्रिक अडचणी दूर केल्यानंतर त्यांचा विचार केला जाणार असल्याचे पांडे यांनी सांगितले.