जमीर काझी मुंबई : पोलीस उपनिरीक्षक पदासाठी ५ वर्षांपूर्वी झालेल्या विभागीय अर्हता परीक्षेनंतर सेवा जेष्ठतेबाबतचा संभ्रम आणि त्याबाबत दीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर, वर्दीवर ‘टू स्टार’लावण्यामध्ये अपयशी ठरलेल्या पोलिसांसाठी खूशखबर आहे. आता पुन्हा या परीक्षेला ‘मुहूर्त’ मिळाला असून, एप्रिलच्या मध्यावर ही परीक्षा होईल. या कोट्यातून ३ वर्षांत रिक्त होणाºया सुमारे ९००च्या वर पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.पोलीस मुख्यालयाकडून यापूर्वी सप्टेंबर २०१३ मध्ये पीएसआयसाठी विभागीय अर्हता परीक्षा घेण्यात आली होती. त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या विविध प्रवर्गातील पोलिसांची सेवाज्येष्ठता व निवड निश्चितीबाबत संभ्रम निर्माण झाल्याने, काही इच्छुकांकडून मॅटपासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत सरकारच्या निर्णयाला आव्हान दिले. टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येणाºया नियुक्तीमुळे संबंधित उमेदवारांत संभ्रमाचे वातावरण होते. आता यापुढील पदाची भरती नव्याने परीक्षा घेऊन घेण्याचा निर्णय पोलीस महासंचालकांनी घेतला आहे.पोलीस दलात उपनिरीक्षक पदाची भरती राज्य लोकसेवा आयोगाद्वारे सरळ सेवा, विभागीय सरळ सेवा व खात्यांतर्गत अर्हता परीक्षेद्वारे भरली जातात. त्यासाठी अनुक्रमे ५०, २५ व २५ टक्के असा कोटा आहे. पूर्वी या परीक्षेसाठी हवालदार व सहायक फौजदार होऊन ५ वर्षे झालेल्यांना बसण्याची पात्रता होती. मात्र, आॅगस्ट २०१३ मधील परीक्षेवेळी ही अट रद्द करून खात्यात भरती झाल्यानंतर, सलग १० वर्षे सेवा झालेल्यांना पात्र ठरविले. त्यामुळे त्या परीक्षेत राज्यभरातून २८ हजार ११४ उमेदवार बसले. त्यातून १९ हजार ३८४ उतीर्ण झाले. मात्र, रिक्त पदाच्या तुलनेत ही संख्या अधिक असल्याने, पात्र उमेदवारांनी सेवाज्येष्ठतेच्या निकषाला आव्हान दिले होते.>जागेनुसार नियुक्तीजानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१९ पर्यंतच्या रिक्त पदासाठी एप्रिलमध्ये परीक्षा होईल. उत्तीर्णांना जागेनुसार टप्प्याटप्प्याने नियुक्ती मिळेल. परीक्षेसाठी पूर्वीचे निकष कायम असून, भरती झालेल्या दिनांकापासून सेवाज्येष्ठता गृहित धरली जाईल. असे अपर महासंचालक (प्रशिक्षण व खास पथक) एस. जगन्नाथन यांनी सांगितले.
पीएसआयच्या अर्हता परीक्षेला अखेर मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 5:43 AM