बहुमजली इमारतीला लागलेल्या आगीत मानसोपचार तज्ज्ञाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 08:09 AM2023-09-24T08:09:49+5:302023-09-24T08:10:18+5:30

दादरच्या हिंदू कॉलनीतील दुर्घटना, वैद्यकीय वर्तुळात हळहळ

Psychiatrist dies in multi-storied building fire | बहुमजली इमारतीला लागलेल्या आगीत मानसोपचार तज्ज्ञाचा मृत्यू

बहुमजली इमारतीला लागलेल्या आगीत मानसोपचार तज्ज्ञाचा मृत्यू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : दादर येथील हिंदू कॉलनीतील ‘रेन ट्री’ या बहुमजली इमारतीला शनिवारी सकाळी लागलेल्या आगीत १३व्या मजल्यावरील रहिवासी व प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सचिन पाटकर यांचा मृत्यू झाला. ते ६० वर्षांचे होते. आगीचा धूर त्यांच्या छातीत गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. 

दादर पूर्व परिसरातील हिंदू कॉलनीतील १५ मजली रेन ट्री इमारतीच्या १३व्या मजल्यावर आग लागली. आगीमुळे इमारतीत धूर पसरला होता. आगीचे वृत्त समजताच, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बचाव कार्य सुरू केले. धुरामुळे इमारतीमधील रहिवासी डॉ. सचिन पाटकर (६०) गुदमरले. त्यांना तत्काळ शीव येथील रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी पाटकर यांना मृत घोषित केले. 

डॉ. सचिन पाटकर यांच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.  ३० वर्षांपेक्षा अधिक काळ ते मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत होते. त्यांचा या क्षेत्रातील मोठा अनुभव असून, असंख्य रुग्णांवर त्यांनी उपचार केले आहेत. ज्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली, त्यावेळी ते एकटेच घरी होते. डॉ. पाटकर यांचे वडील डॉ. आनंद पाटकर हेही मानसोपचार तज्ज्ञ म्हणून नावाजलेले आहेत. ते नायर रुग्णालयात मानसोपचार विभागाचे प्रमुख होते. आई-वडिलांजवळ राहता यावे, म्हणून रेन ट्री इमारतीत डॉ. सचिन पाटकर भाड्याने राहात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

डॉ.पाटकर यांचे वैद्यकीय शिक्षण केईएम रुग्णालयातून झाले आहे. त्यांची खूप चांगली प्रॅक्टिस होती. अत्यंत चांगल्या स्वभावाचे असणारे डॉ. पाटकर यांची बातमी मिळताच, मला काही क्षण धक्काच बसला. अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे. 
- डॉ. शुभांगी पारकर, केईएमच्या माजी अधिष्ठाता, मानसोपचार तज्ज्ञ 

डॉ.पाटकर अतिशय प्रेमळ होते. माझी ३५ वर्षांपासून त्यांच्यासोबत मैत्री होती. त्यांची रुग्णस्नेही म्हणून अशी ओळख होती. प्रचंड विद्वान असे ते डॉक्टर होते. त्यांच्या निधनामुळे वैद्यकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.     - डॉ. हरीश शेट्टी, मानसोपचार तज्ज्ञ 

Web Title: Psychiatrist dies in multi-storied building fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.