मानसिक तणाव मुंबईत सर्वाधिक, सोशल मीडियाही ताणाचे कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 06:45 AM2017-10-24T06:45:38+5:302017-10-24T06:45:48+5:30
मुंबई : घड्याळाच्या काट्यावरचा दिनक्रम, स्पर्धात्मक करिअर अशा एक ना अनेक कारणांमुळे मुंबईकर मानसिक तणावात असतातच
मुंबई : घड्याळाच्या काट्यावरचा दिनक्रम, स्पर्धात्मक करिअर अशा एक ना अनेक कारणांमुळे मुंबईकर मानसिक तणावात असतातच, पण आता त्यात सोशल मीडियावरील प्रतिसाद, गेम्समधील लेव्हलचा नाद यांसारख्या कारणांचीही भर पडली आहे. देशभरात मुंबई शहर-उपनगरातील लोक सर्वाधिक ताणतणावात असून, त्यांना मानसोपचाराची गरज असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.
एप्रिल ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत देशभरात मानसिक आजारांविषयी एक सर्वेक्षण झाले. त्यात मुंबईतून मानसोपचारतज्ज्ञांनी सहभाग घेतला. तो अहवाल नुकताच केंद्रीय आरोग्य विभागाला सादर झाला. हा अहवाल मुंबईकरांच्या जिवाला घोर लावणारा आहे. मुंबईतील बहुतांश जणांचे मानसिक आजार हे नैराश्य (डिप्रेशन) आणि अँक्झायटीशी (दु:श्चिंता) संबंधित आहेत. यात १० वर्षांच्या मुलापासून ते वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांचा समावेश आहे. सोशल मीडियावर वारंवार पोस्ट करणे, काही मिनिटांच्या अंतराने लाइक्स वा कमेंट्स पाहणे, अन्य नेटिझन्सचे प्रोफाइल्स फोटो पाहून विचलित होणे, आॅनलाइन गेमिंग करताना सतत एकाच लेव्हलमध्ये अडकणे, आॅनलाइन गेमिंगमध्ये पैसे हरणे अशा छोट्या-छोट्या गोष्टींतून आता मुंबईकर मानसिक आजारांच्या गर्तेत अडकत आहेत, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नूतन लोहिया यांनी सांगितले. सध्या मुंबईत ३८ हजार ५८८ नागरिक मानसिक उपचार घेत आहेत.
>मानसिक आजार
नैराश्य, फेसबुक डिप्रेशन, आॅनलाइन गेमिंग अॅडिक्शन, सायबर बुलिंग, अँक्झायटी, सायकोसिस, बायपोलर डिसॉर्डर, डिमेन्शिया, बॉडी इमेज इश्यू, अटेन्शन डेफिसिट हायपरअॅक्टिव्हिटी डिसॉर्डर
>सोशल मीडियावर वारंवार पोस्ट करणे, काही मिनिटांच्या अंतराने लाइक्स वा कमेंट्स पाहणे, अन्य नेटिझन्सचे प्रोफाइल्स फोटो पाहून डिस्टर्ब होणे, आॅनलाइन गेमिंग करताना सतत एकाच लेव्हलमध्ये अडकणे, आॅनलाइन गेमिंगमध्ये पैसे हरणे अशा छोट्या-छोट्या लक्षणांतून मुंबईकर अधिकाधिक मानसिक आजारांच्या गर्तेत अडकत आहेत.
कोलकातामधील २७ हजार ३९४, बंगळुरू येथील २४ हजार ३४८ नागरिक मानसिक उपचार घेत आहेत. महाराष्ट्रात १ लाख २५ हजार लोक मानसोपचार घेतात, असे अहवालात नमूद केले आहे.