‘गाव तिथे मानसोपचार’ उपक्रमातून खेड्यापाड्यात पोहोचणार मानसोपचारतज्ज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 06:37 AM2019-04-15T06:37:22+5:302019-04-15T06:37:28+5:30
गेल्या काही वर्षांपासून जागतिक पातळीवर मानसिक आजारांची समस्या गंभीर होते आहे.
मुंबई : गेल्या काही वर्षांपासून जागतिक पातळीवर मानसिक आजारांची समस्या गंभीर होते आहे. शहरातील या समस्येचे प्रमाण वाढत आहे. शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही मानसिक आजाराच्या समस्येचा आलेख चढता आहे. परंतु, दुर्दैवाने अजूनही राज्यातील आरोग्य व्यवस्था या समस्येपर्यंत पोहोचण्यास अपयशी ठरत आहे. त्यामुळे काही मानसोपचारतज्ज्ञांनी एकत्र येऊन राज्यभरात ‘गाव तिथे मानसोपचार’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील ७० मानसोपचारतज्ज्ञांनी एकत्र येऊन ४० गावांमध्ये विनाशुल्क मानसोपचार देण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने हा उपक्रम सुुरू करण्यात आला आहे. बॉम्बे सायकियाट्रिस्ट सोसायटीचे मानद सचिव डॉ. मिलन बालाकृष्णन यांनी सांगितले की, बऱ्याचदा शहरातील मानसिक ताणतणाव आणि नैराश्याविषयी आपण बोलत असतो. मात्र ही समस्या खेड्यापाड्यांतही तितकीच गंभीर आहे.
शिवाय, याविषयी जनजागृती नसल्याने त्याचा धोका गावाखेड्यातील लोकांना माहीत नाही, तसेच आर्थिक स्थिती नीट नसल्याने उपचार घेणेही शक्य नसते. त्यामुळे या उपक्रमाच्या साहाय्याने त्यांच्यात जनजागृती करणे आणि प्राथमिक स्तरावर उपचार, समुपदेशन करण्यात येणार आहे.
यात निवडलेल्या गावांमध्ये घरोघरी जाऊन पत्रके वाटण्यात आली आहेत. या पत्रकांच्या माध्यमातून नैराश्याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. त्याचवेळी प्रत्येक गावात एखाद्या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना निमंत्रित करून त्यांना एकत्रितपणे प्रोजेक्टर किंवा इतर साहित्याच्या आधारे मुळात नैराश्य म्हणजे नेमके काय, दु:खी होणे आणि नैराश्यामध्ये नेमका काय फरक आहे; तसेच नैराश्याचा मानसिक आजारांमध्ये कोणत्या कारणामुळे समावेश होतो आणि त्यावरील विविध उपचार पद्धती कोणकोणत्या आहेत, याविषयीदेखील ग्रामस्थांना सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
>मानसिक आरोग्य धोरणाविषयी जनजागृती
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अमोल देशमुख यांनी या उपक्रमाविषयी सांगितले की, मराठवाड्यात पैठण, माळीवाडा व परभणी जिल्ह्यातील एका गावात हा पहिला उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. शिवाय, ज्या गावात भेट देतो तेथे आम्ही फीडबॅक फॉर्मही ठेवले आहेत. मे महिन्यात पुन्हा एकदा त्याच गावांना भेट देण्यात येणार आहे. या भेटीत स्थानिकांसह मानसिक आरोग्य धोरणाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. हा उपक्रम वर्षअखेरपर्यंत सुरू ठेवण्यात येईल, त्यानंतर या उपक्रमातील निरीक्षण व माहिती मांडण्यात येणार आहे.