Join us

पं.पंढरीनाथ कोल्हापुरे यांचे निधन

By admin | Published: August 16, 2015 11:56 PM

ज्येष्ठ शास्त्रीय गायक आणि प्रसिद्ध वीणावादक पं. पंढरीनाथ कोल्हापुरे यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना

मुंबई : ज्येष्ठ शास्त्रीय गायक आणि प्रसिद्ध वीणावादक पं. पंढरीनाथ कोल्हापुरे यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे-शर्मा, शिवांगी कपूर, तेजस्विनी सारस्वत, जावई शक्ती कपूर, प्रदीप शर्मा, पंकज सारस्वत आणि नातवंडे असा परिवार आहे. पंढरपूर येथे १९३० साली पं. पंढरीनाथ कोल्हापुरे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील पंडित कृष्णराव कोल्हापुरे हे नामांकित गायक तर होतेच, पण पट्टीचे वीणावादकही होते. ते मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्यासमवेत बळवंत संगीत नाटक कंपनीचे भागीदारही होते. वडिलांकडून प्राथमिक धडे गिरवल्यावर पंडित मधुसूदन जोशी आणि खां साहेब अता हुसेन या आग्रा घराण्याच्या ज्येष्ठ गायकांकडून पंढरीनाथांनी तालीम घेतली. कोल्हापुरे कुमार गंधर्वांना गुरुस्थानी मानत. बडोद्यातल्या आॅल इंडिया म्युझिक कॉन्फरन्समध्ये वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी जाणकारांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर वयाच्या १५व्या वर्षी ते पहिल्यांदा रेडिओवर गायले. देवधर मास्तरांकडे शिक्षण सुरू झाल्यावर पंढरीनाथांना कुमार भेटले. पं. पंढरीनाथ यांनी तीन पुस्तकेही लिहिली. पं.कुमार गंधर्व यांना समर्पित ‘गानयोगी शिव पुत्रा’, पत्नी निरुपमा कोल्हापुरे यांना समर्पित ‘शब्द सुरांचे बोल रुद्र वीणाचे’ आणि तिसरे पुस्तक १८ व्या शतकातील ख्याल गायकीचे निर्माते नियामत खान यांच्यावर आधारित ‘नियामत खान - सदारंग’ यामध्ये नियामत यांच्या बंदिशींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)