मुंबई - राज्यात होत असलेली अंमली पदार्थांची तस्करी आणि सरकारकडून मद्यविक्रीबाबत घेतली जात असलेली अनुकूल भूमिका यावरून भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे. राज्यातील सत्ताधारी ठाकरे सरकारकडून पब पार्टी आणि पेग हाच अजेंडा राबवला जात असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या मद्यावरील उत्पादन शुक्ल ५० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, त्या निर्णयावरून आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर ही टीका केली आहे. या संदर्भात केलेल्या ट्वीटमध्ये शेलार म्हणाले की, हे सरकार पब, पार्टी आणि पेगचा अजेंडा चालवत आहेत.
दरम्यान, परदेशातून आयात होणाऱ्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात ५० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे परदेशी मद्याच्या किमतीत घट होणार आहे. सध्या आयात स्कॉच व्हिस्कीवर ३०० टक्के अबकारी कर आकारला जातो, यापुढे तो १५० टक्के आकारला जाईल. शुल्क कपातीमुळे या मद्याची मागणी वाढून २५० कोटी रुपयांची मिळकत राज्याला प्राप्त होईल. शिवाय आयात स्कॉच व्हिस्कीची विक्री १ लाख बाटल्यांवरून २.५ लाख बाटल्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात स्कॉच व्हिस्कीचे दर अधिक असल्यामुळे तस्करीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे राज्याचा महसूल बुडत होता. शिवाय बनावट मद्याचे पेवही फुटले होते. या प्रकारांना आळा घालण्यासाठी स्कॉच व्हिस्कीचे दर इतर राज्यांसम करण्यासाठी शुल्क कपातीचा निर्णय घेतल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाशी संबंधित अधिकाऱ्याने दिली.