कर्करोगाविषयी जनजागृती वाढतेय, शैलेश श्रीखंडे यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 02:15 AM2019-05-06T02:15:18+5:302019-05-06T02:15:32+5:30
कर्करोगाचे प्रमाण वाढत असले तरी कर्करोगाबद्दलची जाणीवही समाजात वाढत असल्याचे प्रतिपादन टाटा कर्करोग रूग्णालयाचे उपसंचालक प्रा. डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात केले.
मुंबई : कर्करोगाचे प्रमाण वाढत असले तरी कर्करोगाबद्दलची जाणीवही समाजात वाढत असल्याचे प्रतिपादन टाटा कर्करोग रूग्णालयाचे उपसंचालक प्रा. डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात केले. चुनाभट्टी येथे मराठी विज्ञान परिषदेत पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. श्रीखंडे बोलत होते.
डॉ. श्रीखंडे यांनी ‘भारतातील कर्करोगाचे वाढते प्रमाण आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय’ याविषयी विचार मांडले. कर्करोग म्हणजे काय, कर्करोगाचे प्रकार, टप्पे, निदान पद्धती, उपचारपद्धती, सुधारणा, भाभाट्रॉन हे रेडिएशन थेरपीसाठी भारतात तयार केलेले संयंत्र, विविध क्षेत्रातील डॉक्टरांचा एक गट म्हणून काम करण्याची गरज इत्यादी गोष्टींचा ऊहापोह केला.
मराठी विज्ञान परिषदेने आय.सी.टी. (मुंबई), आय.आय.टी. (मुंबई), विज्ञान आश्रम (पाबळ, जि.पुणे) इत्यादी अनेक संस्थांबरोबर केलेल्या सामंजस्य करारांची माहिती देताना, शेतीतील उत्पादकता वाढवणे, सौर उर्जेचा वापर करून सतत चालणारा कुकर तयार करणे, कमी खर्चाची पाणी शुद्धीकरण यंत्रणा विकसित करणे असे संशोधन प्रकल्प परिषदेने यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे प्रा. जयंत जोशीनी सांगितले.
त्यानंतर तासकर लघुद्योजक पुरस्कार ऋषिकेश बदामीकर (रिचवूड, सोलापूर), यांना तर परीक्षकांचा उत्तेजनार्थ पुरस्कार योगेश नाईक (मॅगटेक असोसिएट्स, पुणे) यांना प्रदान करण्यात आला. यंदाचे शरद नाईक विज्ञान संशोधन पुरस्कार बांदोडकर महाविद्यालयाच्या (ठाणे) मनाली नेमन व हिमाद्री काले यांना, परशुराम बाजी आगाशे संशोधन पुरस्कार बांदोडकर महाविद्यालयाच्या (ठाणे) स्नेहल पुजारी व लतिका अंचन आणि लीला परशुराम आगाशे संशोधन पुरस्कार डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट् आॅफ इंजिनिअरिंगच्या आयुष अग्रवाल व गौरव धांडे यांना प्रदान करण्यात आले.
कार्यवाह डॉ. जयंत जोशी यांनी ई-पुस्तके व बोलक्या पुस्तकांच्या उपक्रमाची माहिती सांगितली. तसेच ‘रानातली गोष्ट, मनातली गोष्ट’ या डॉ. नंदिनी देशमुख लिखित पुस्तकाच्या बोलक्या पुस्तकाचे प्रकाशन झाले.