स्नेहा मोरे / मुंबईपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच गुजरातमध्ये एका रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात जेनेरिक औषधांविषयी सरकार कठोर कायदे करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर याची दखल घेत त्वरित मेडिकल काऊन्सिल आॅफ इंडियानेही डॉक्टरांनी रुग्णांना जेनेरिक औषधांची चिठ्ठीच लिहून द्यावी, याविषयीचे परिपत्रक काढले आहे. याच धर्तीवर आता सामान्यांमध्ये जेनेरिक औषधांबाबत जनजागृती व्हावी याकरिता महाराष्ट्र फार्मासिस्ट्स रजिस्टर्ड असोसिएशनने पुढाकार घेतला आहे.एकीकडे अमेरिका जेनेरिक औषधांमुळे अब्ज डॉलर वाचवत असताना दुसरीकडे भारतीय कंपन्या जेनेरिक औषधांची मोठ्या प्रमाणावर निर्यात करत असून देशात मात्र ब्रँडेड नावानेच औषधे विकत आहेत. त्यामुळे भविष्यात ब्रँडेड औषधांचा काळाबाजार संपुष्टात यावा आणि जेनेरिक औषधांकडे आरोग्यसेवा क्षेत्र वळावे, यासाठी फार्मासिस्ट असोसिएशनने सोशल मीडियाचा वापर करण्याचे ठरविले आहे. या माध्यमातून फेसबुक, टिष्ट्वटर आणि व्हॉट्सअॅप अशा सोशल व्यासपीठांद्वारे ‘लघुकथा’ फॉरवर्ड करण्यास सुरुवात केली आहे. या लघुकथेच्या माध्यमातून व्यक्तींच्या संभाषणाद्वारे जेनेरिक औषधांविषयीचे महत्त्व, तक्रारी, सूचना यांच्याविषयी विश्लेषण करण्यात येत आहे. मेडिकल काऊन्सिल असो वा केंद्र आणि राज्य शासन यांच्याप्रमाणे फार्मासिस्ट्स असोसिएशननेही जेनेरिक औषधांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करायला पाहिजेत. असोसिएशनने ही जबाबदारी ओळखून ‘लघुकथा’ सुरू केल्या आहेत. त्याचप्रमाणे, माहितीपत्रके, भित्तीपत्रके यांच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातील जनजागृती मोहीम सुरू करण्यात येणार आहे.जेनेरिक औषधे म्हणजे काय?कित्येक वर्षांच्या संशोधनानंतर शोधल्या गेलेल्या फॉर्म्युल्यानुसार औषध तयार केले जाते. औषधाचा प्रत्यक्ष उत्पादन खर्च कमी असेल तर संशोधनावरील खर्च भरून काढणे कंपनीसाठी अत्यावश्यक असते. यासाठी या औषधांची निर्मिती करण्याचा हक्क काही वर्षांकरिता फक्त त्याच कंपनीला देण्यात येतो व ती औषधे कंपनीच्या नावानेच बाजारात उपलब्ध होतात. या दरम्यान औषधाच्या संशोधनावरील खर्च वसूल झाल्यानंतर इतर औषध कंपन्यांना ही औषधे तयार करता येतात. या औषधात वापरलेल्या रासायनिक संयुगांवरून ती औषधे ओळखता येतात.
जेनेरिक औषधांविषयी ‘लघुकथां’मधून जनजागृती
By admin | Published: April 24, 2017 3:45 AM