Join us

तृतीयपंथीय करणार तंबाखूच्या दुष्परिणांमाविषयी जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 2:29 AM

जागतिक तंबाखूविरोधी दिनाच्या निमित्ताने कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनने तृतीयपंथीयांचा सन्मान करीत एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे

मुंबई : जागतिक तंबाखूविरोधी दिनाच्या निमित्ताने कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनने तृतीयपंथीयांचा सन्मान करीत एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या व्यसनाविरोधात जनजागृती करण्याचे कार्य तृतीयपंथीयांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याकरिता, बुधवारी तृतीयपंथीयांमध्ये तंबाखूविरोधी संदेशाचा प्रसार करणाऱ्या तसेच १५ वर्षांहूनही अधिक काळ जडलेले तंबाखूचे व्यसन सोडून देण्यास तयार झालेल्या विक्रम आर. शिंदे, माधुरी सरोदे शर्मा, प्रिया पाटील, माही गुप्ता आणि मोना कांबळे या पाच तृतीयपंथीयांचा एका कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.वांद्रे येथील हॉटेलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात मोहिमेला पाठबळ देण्यासाठी तंबाखू नियंत्रण या मोहिमेचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर विवेक ओबेरॉय या वेळी उपस्थित होता.‘जागतिक तंबाखूविरोधी दिना’ची संकल्पना ‘तंबाखू आणि हृदयरोग’ अशी असून त्याचा सर्व भर जगभरतील लोकांच्या आरोग्यावर तंबाखूमुळे कोणते कार्डीओहॅस्क्यूलर (हृदय व रक्तवाहिन्यांच्या संबंधातील) परिणाम होतात यावर असेल. या कार्यक्रमाला तंबाखू नियंत्रण पॅनेलमध्ये अभिनेते अनुपम खेर, सीपीएएचे संस्थापक अध्यक्ष वाय. के. सप्रू, ओ. के. कौल, माजी खासदार प्रिया दत्त, अभिनेत्री नीतू चंद्रा आणि गायिका नेहा भसीन उपस्थित होते.या मोहिमेबद्दल विवेक ओबेरॉय म्हणाला, धूम्रपान आणि तंबाखूसेवन या केवळ वैयक्तिकच नाही तर सामाजिक दुष्परिणाम साधणाºया गोष्टी आहेत. सर्वच वयोगटांमध्ये तंबाखू सेवनाच्या सवयी वाढत आहेत, हे ऐकून मला धक्काच बसला. त्यातून एकूणच सामाजिक आरोग्याला मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाला आहे. या सामाजिक प्रश्नावर आपण सर्वांनी एकत्रितपणे लढण्याची गरज आहे.सीपीएएचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वाय. के. सप्रू म्हणाले, यंदा ‘जागतिक तंबाखूविरोधी दिना’निमित्ताने तंबाखू उत्पादन उद्योग ज्या धोकादायक क्लृप्त्या अवलंबतो त्यावर निर्णयक्षम व्यक्ती आणि सर्वसामान्य लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. टाळता येण्यासारख्या अशा या जीवघेण्या रोगाबाबत धूम्रपान करणारे आणि धूम्रपानाच्या उंबरठ्यावर असलेले प्रौढ यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्याचाही त्यामागे हेतू आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार दरवर्षी साधारण ५० लाख लोक धूम्रपानामुळे अवेळी मृत्यू पावतात आणि हा आकडा २०२०पर्यंत १ कोटींहूनही पुढे जाणार आहे.तंबाखूसेवन हे भारतातील मृत्यूंच्या काही प्रमुख कारणांपैकी एक आहे. जागतिक स्तरावर दरवर्षी साधारण ६० लाख लोक तंबाखूसेवानामुळे मृत्युमुखी पडतात. त्याचबरोबर तंबाखूच्या संपर्कात आल्याने तब्बल ६ लाख लोकांचा अवेळी मृत्यू होतो. जर आपण काही पावले उचलली नाहीत, तर २०३० पर्यंत साधारण ८० लाख लोक या कारणासाठी मृत्युमुखी पडतील. त्यातील साधारण ८० टक्के लोक निम्न आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमधील असतील.