Join us

राज्यात ९ लाख मतदारांत व्हीव्हीपॅटबाबत जनजागृती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2019 5:32 AM

निवडणूक आयोगाची मोहीम : प्रत्येक मतदारसंघात दोन पथकांची नेमणूक

मुंबई : येत्या निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनसोबत (ईव्हीएम) व्होटर व्हेरिफाइड पेपर आॅडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) यंत्रांचा प्रथमच वापर केला जाणार आहे. या यंत्राची माहिती मतदारांना व्हावी यासाठी राज्यातील प्रत्येक मतदारसंघात जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकाने ३ जानेवारी २०१९ पर्यंत ३६ जिल्ह्यांतील ९५ हजार ४७३ मतदान केंद्रांना भेटी देत तब्बल ९ लाख ९१ हजार ९०३ मतदारांमध्ये व्हीव्हीपॅट यंत्राबाबत जागृती केली आहे.

प्रत्येक मतदारसंघात २ स्वतंत्र पथके नेमण्यात आली आहेत. या प्रत्येक पथकाकडून दररोज सरासरी एक हजार मतदारांना व्हीव्हीपॅटची माहिती दिली जाते. या पथकांनी दररोज किती मतदान केंद्रांना भेटी दिल्या, याची माहिती संकलन करण्यासाठी जिल्हास्तरावर खास विभाग तयार करण्यात आला आहे. ते जिल्हास्तरीय दैनंदिन अहवाल मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवितात. या अहवालानुसार, आतापर्यंत नाशिकमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे एकूण ८३ हजार ६९० मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे.मुंबईतही शुभारंभमुंबई शहर जिल्ह्यात २५ जानेवारी २०१९ पर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ वरळी मतदारसंघातील नेहरू तारांगण येथे करण्यात आला. ३ जानेवारीपर्यंत मुंबई शहरात आणि उपनगरात अनुक्रमे २४ हजार ३१५ आणि ३३ हजार २४८ मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. या दरम्यान अनुक्रमे २५९२ व ७२९७ मतदान केंद्रांना भेटी देण्यात आल्या. मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट यंत्रांबाबत माहिती घेऊन मतदार आपल्या शंकांचे निरसन करून घेत असल्याची माहिती कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिली. 

टॅग्स :निवडणूकमुंबई