मुंबईतील नाक्यांवर जनजागृती मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 05:19 AM2017-12-27T05:19:48+5:302017-12-27T05:19:53+5:30
मुंबई : नाका कामगार व कुटुंबीयांसाठी शासनाने आखलेल्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि इतर योजनांची माहिती करून देण्यासाठी भारतीय सेवा नाका कामगार संघटनेने मुंबईतील नाक्यांवर जनजागृती मोहीम सुरू केली आहे.
मुंबई : नाका कामगार व कुटुंबीयांसाठी शासनाने आखलेल्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि इतर योजनांची माहिती करून देण्यासाठी भारतीय सेवा नाका कामगार संघटनेने मुंबईतील नाक्यांवर जनजागृती मोहीम सुरू केली आहे. १ डिसेंबर रोजी राज्यात सुरू झालेल्या या मोहिमेचा समारोप मुंबईत होत असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अॅड. नरेश राठोड यांनी दिली.
राठोड यांनी सांगितले की, नाका कामगारांच्या योजनांची अंमलबजावणी होण्यासाठी कामगारांची नोंदणी करणे महत्त्वाचे आहे. मात्र विविध कागदपत्रे आणि जाचक अटींमुळे कामगार नोंदणीपासूनच वंचित राहत आहेत. म्हणूनच कामगारांच्या नोंदणीच्या संख्येत वाढ होण्यासाठी जनजागृती अभियान हाती घेतलेले आहे. त्यासाठी राज्यातील महत्त्वाच्या नाक्यानाक्यांवर चौकसभा घेऊन आणि पत्रके वाटून जनजागृती करीत आहोत. मोहिमेचा समारोप जवळ झाला असून नाका कामगार असणाºया प्रमुख नाक्यांवर जनजागृती सुरू आहे. ३ जानेवारीला या अभियानाचा समारोप मुंबईतील आझाद मैदानात होणार आहे. नाका कामगार व असंघटित कामगारांसाठी राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या नावाने स्वतंत्र कामगार महामंडळ स्थापन करण्याची मागणीही शासनाकडे केल्याचे राठोड यांनी सांगितले.