मुंबई : महापालिकेतर्फे हिवताप, डेंग्यू, लेप्टो, स्वच्छता या विषयांवर जनजागृती करण्यासाठी बदलत्या संदेश फलकाचा वापर सुरू करण्यात आला आहे. प्राथमिक स्तरावर परळ येथे जनजागृतीसाठी महापालिकेने बदलता संदेश फलक बसवला असून, या फलकावरील संदेश दर ३० सेकंदांनी बदलत आहेत.एफ/दक्षिण विभाग कार्यालयाखालील अत्यंत वर्दळीच्या पदपथाजवळील भिंतीवर अंतर्गत विद्युत प्रकाश व्यवस्था असणाऱ्या जनजागृतीपर फलकाचे उद्घाटन कार्यकारी आरोग्य अधिकारी पद्मजा केसकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या फलकाचे वैशिष्ट्य म्हणजे या फलकावरील संदेश दर ३० सेकंदांनी बदलत आहेत. सध्या या फलकाद्वारे हिवताप, डेंग्यू, लेप्टो, स्वच्छता आदी ५ विषयांवरील संदेश प्रदर्शित केले जात आहेत, असे एफ/दक्षिण विभागाचे साहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी सांगितले. एफ/दक्षिण विभाग कार्यालयाद्वारे अधिक प्रभावी जनजागृतीसाठी आकर्षक पद्धतीचे विद्युत आधारित बदलते संदेश फलक महत्त्वाच्या वर्दळीच्या ठिकाणी बसविण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे. याअंतर्गत प्रायोगिक स्तरावर पहिला संदेश फलक नुकताच कार्यान्वित करण्यात आला आहे. या फलकावरील संदेश हे प्रासंगिक आवश्यकतांनुसार बदलण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
बदलता संदेश फलक करणार आरोग्याची जनजागृती
By admin | Published: September 09, 2016 3:37 AM