थॅलेसेमियाच्या मुक्तीसाठी जनजागृती महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 05:28 AM2018-05-08T05:28:15+5:302018-05-08T05:28:15+5:30

देशामध्ये किमान पाच कोटी व्यक्ती या थॅलेसेमिया मायनर आहेत, तर दरवर्षी दहा हजार ‘थॅलेसेमिया मेजर’ रुग्णांची भर पडत आहे. त्याचवेळी आपल्या देशामध्ये २ ते ५ टक्के थॅलेसेमिया ‘मेजर’ किंवा ‘मायनर’ मूल जन्मण्याचा धोका आहे. असे असतानाही सरकारी पातळीवर आजही याविषयी प्रतिबंधात्मक पावले उचलली जात नसल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

Public awareness is important for Thalassemia's liberation | थॅलेसेमियाच्या मुक्तीसाठी जनजागृती महत्त्वाची

थॅलेसेमियाच्या मुक्तीसाठी जनजागृती महत्त्वाची

Next

मुंबई  - देशामध्ये किमान पाच कोटी व्यक्ती या थॅलेसेमिया मायनर आहेत, तर दरवर्षी दहा हजार ‘थॅलेसेमिया मेजर’ रुग्णांची भर पडत आहे. त्याचवेळी आपल्या देशामध्ये २ ते ५ टक्के थॅलेसेमिया ‘मेजर’ किंवा ‘मायनर’ मूल जन्मण्याचा धोका आहे. असे असतानाही सरकारी पातळीवर आजही याविषयी प्रतिबंधात्मक पावले उचलली जात नसल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे.
थॅलेसेमिया या आजाराचे उच्चाटन करण्यासाठी आरोग्यसेवा यंत्रणांनी एकत्र येत विशेष प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अ‍ॅडमिशन फॉर्मवर या त्याच्या चाचणीविषयी लिहिण्याची सक्ती करणारा कॉलम हवा. शिवाय, विवाहाचा दाखला मिळवण्यासाठी ही चाचणी सक्तीची केली पाहिजे. जेणेकरून त्या जोडप्यांचे अपत्य ‘थॅलेसेमिया मेजर’ होण्यापासून वाचेल, असे मत सपोर्ट अ‍ॅण्ड एड फॉर थॅलेसेमिया हिलिंग (साथ) संस्थेच्या संस्थापिका सुजाता रायकर यांनी व्यक्त केले. या संस्थेच्या माध्यमातून मुंबईसह राज्यभरातील जवळपास ९० थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांचे पालकत्व रायकर यांनी स्वीकारले आहे.
यातील अडथळ्यांविषयी रायकर म्हणाल्या, थॅलेसेमियाचे प्रमाण पाहता भविष्यात रक्ताचा तुटवडा भासण्याची चिन्हे आहेत. थॅलेसेमियाची लक्षणे बाळांमध्ये ३ ते ६ महिन्यांदरम्यान दिसू लागतात. हा आजार जडल्यानंतरच लक्षात येण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. स्त्री आणि पुरुष हे दोघेही थॅलेसेमियाचे वाहक (थॅलेसेमिया मायनर) असतील तर त्यांच्या मुलांमध्ये बिटा थॅलेसेमिया आढळून येण्याची शक्यता २५ टक्क्यांपर्यंत असते. आई-वडिलांकडून मुलाला आनुवंशिकतेमुळे जनुकांद्वारे अनेक शारीरिक वैशिष्ट्ये, गुणधर्म प्राप्त होतात. याचे एका पिढीतून दुसऱ्या पुढच्या पिढीत वहन होत जाते.

असे होते निदान
- व्यक्ती वाहक असल्याचे निदान रक्त तपासणीतून होते. यासाठी हिमोग्लोबीन इलेक्ट्रोफोरेसिसची चाचणी गरजेची असते. या आजारात वाहकाच्या दैनंदिन जीवनात फारसा बदल होत नाही. अशा व्यक्तींच्या शारीरिक व मानसिक स्थितीत कमजोरी दिसत नाही.
- या आजाराने बाधित व्यक्तीचा साथीदार जर वाहक असेल तर त्याच्या मुलांना थॅलेसेमिया मेजर होण्याची शक्यता असते. याचे प्रमाण ज्या समूहांमध्ये जास्त आहे त्यांमध्ये लग्न ठरण्याआधी स्त्री किंवा पुरुष दोहोंनी रक्ताची चाचणी करून व्याधीचे निदान करणे आवश्यक आहे.

थॅलेसेमिया आजारात थॅलेसेमिया जनुक आई किंवा वडिलांच्या माध्यमातून अपत्यात येते आणि काही वेळा दोघांकडून प्रत्येकी एक जनुक येतानाही दिसून येतात. परिणामी, रक्ताशी संबंधित थॅलेसेमियाचा आजार होण्याची शक्यता वाढते. या रोगात शरीरातील रक्त निर्माण होणाच्या प्रक्रियेत अडथळा येतो. ज्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते. अशा वेळी रुग्णांच्या शरीरात लाल रक्तपेशींची संख्या १२० दिवसांऐवजी कमी दिवस पुरेल इतकी खाली येते. त्यामुळे या आजाराच्या जनजागृतीवर अधिकाधिक भर दिला पाहिजे.
- डॉ. साहिल कीरकिरे

Web Title: Public awareness is important for Thalassemia's liberation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.