Join us

लोकांना हवेत चार्टर्ड अकाउंटंट अन् कर सल्लागार, सर्वेक्षणातून माहिती उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2023 6:17 AM

प्रक्रियेतील क्लिष्टतेमुळे वाढली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गेल्या काही वर्षांत लोकांचे वाढलेले उत्पन्न, गुंतवणुकीसाठी हाती आलेला पैसा, कर विवरण प्रक्रियेत झालेले आमूलाग्र बदल आणि दोन कर प्रणाली या पार्श्वभूमीवर चार्टर्ड अकाउंटंट तसेच कर सल्लागार व्यावसायिकांच्या मागणीमध्ये वाढ झाल्याची माहिती एका अग्रगण्य कंपनीने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे पुढे आली आहे.

जस्ट डायल या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार, २०२२ च्या तुलनेत २०२३ च्या पहिल्या तिमाहीमध्ये चार्टर्ड अकाउंटंट तसेच कर सल्लागारांकडे जाण्याच्या प्रमाणात ४७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबई, दिल्ली आदी मेट्रो शहरांमधूनच कर व्यावसायिकांकडे जाण्याचा प्रघात फार पूर्वीपासून आहे. मात्र, विशेष म्हणजे, इंदूर, चंदिगड, लखनौ यांसारख्या बिगर मेट्रो शहरांतून मागणी वाढत असल्याचे दिसून आले आहे.

कर व्यावसायिकांची वाढलेली मागणी ही आर्थिक उलाढाल पुन्हा एकदा जोमाने वाढत असल्याचे निर्देशित करत आहे, असे मत जस्ट डायलचे उपाध्यक्ष श्वेतांक दीक्षित यांनी व्यक्त केले. आजवर डिसेंबर महिना उजाडला आणि कार्यालयांतून कर मोजणीसाठी जेव्हा कर्मचाऱ्यांकडे त्यांच्या गुंतवणुकीची विचारणा व्हायची, त्यावेळी अनेकांना जाग यायची आणि मग डिसेंबर ते फेब्रुवारी-मार्च महिन्यापर्यंत नोकरदारांची धावपळ उडायची.

ट्रेंडमध्ये बदल

- नोकरदारांच्या ट्रेंडमध्ये आता मात्र, आमूलाग्र बदल झाला असून, एक एप्रिलपासून जेव्हा आर्थिक वर्ष सुरू होते, तेव्हापासूनच कर नियोजन करण्याबद्दल ते जागृत असतात.- सुरुवातीपासूनच उत्पन्न व कराचे नियोजन केल्यानंतर ऐनवेळी येणारा ताण कमी होतो, याची लोकांना जाणीव झाल्याची माहिती चार्टर्ड अकाउंटंट सुधाकर देशपांडे यांनी दिली.

टॅग्स :सीएव्यवसाय